नव्या प्रदेशाध्यक्षांना खूप कष्ट घ्यावे लागतील - डिमेलो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 11:43 IST2019-06-29T11:35:16+5:302019-06-29T11:43:17+5:30
काँग्रेसला जो कुणी नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, त्या प्रदेशाध्यक्षाला पक्ष गोव्यात अधिक मजबूत करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील, असे निवेदन काँग्रेसच्या संवाद विभागाचे प्रमुख ट्रोजन डिमेलो यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी केले.

नव्या प्रदेशाध्यक्षांना खूप कष्ट घ्यावे लागतील - डिमेलो
पणजी - काँग्रेसला जो कुणी नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल, त्या प्रदेशाध्यक्षाला पक्ष गोव्यात अधिक मजबूत करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील, असे निवेदन काँग्रेसच्या संवाद विभागाचे प्रमुख ट्रोजन डिमेलो यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी केले.
गिरीश चोडणकर यांनी शुक्रवारी (28 जून) सायंकाळी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा सादर केला आहे. राहुल गांधी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यास तयार नसल्याने देशभरातील काँग्रेस नेते आपल्या पदांचे राजीनामे देत आहेत. चोडणकर यांनीही दिल्लीत राजीनामा पत्र पाठवून दिले. या पार्श्वभूमीवर डिमेलो यांना नवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कसा असावा असे विचारले असता ते म्हणाले की, चोडणकर यांनी गोव्यात काँग्रेस पक्ष बळकट केला आहे. त्यामुळेच गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी जोरदार मोदी लाट असून देखील गोव्यातील दोनपैकी एका जागेवर भाजपाच्या विद्यमान खासदाराचा काँग्रेसला पराभव करणे शक्य झाले. भाजपाच्या ताब्यातील जागा काँग्रेसने खेचून आणली. दुसरी गोष्ट म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यात काँग्रेसची मते सहा टक्क्यांनी वाढली आहेत.
ट्रोजन डिमेलो म्हणाले, की गिरीश चोडणकर यांचा राजीनामा जर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने स्वीकारला तर गोव्यात दुसरा प्रदेशाध्यक्ष येईलच पण नवा प्रदेशाध्यक्ष हा गोव्यात काँग्रेसला अधिक मजबूत करू शकेल असा असावा. भाजपा सरकारशी टक्कर देत व या सरकारमधील भ्रष्ट घटकांना उघडे पाडत काँग्रेस संघटनाही राज्यभर अधिक व्यापक व मजबूत करावी लागेल. नव्या अध्यक्षांना ते काम करावे लागेल. चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात काँग्रेसने स्वत: चा सन्मान वाढविला. काँग्रेसची मते वाढली याचे श्रेय काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ही जाते. चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सतत विविध चळवळी केल्या आहेत व सरकारला घाम काढला. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही काँग्रेसने कायम टक्कर दिली. पणजी मतदारसंघात पंचवीस वर्षात प्रथमच भाजपचा पराभव झाला. चोडणकर यांनी आता देशभरातील पराभवाची सामूहिक व नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे. त्यांची कृती योग्यच आहे.