रेंट अ कार चोरीच्या संशयावरून खून; तिघांना अटक, पीर्ण येथील प्रकरणाचा १५ तासांत छडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 09:48 IST2025-11-02T09:45:14+5:302025-11-02T09:48:20+5:30
जीप चोरल्याच्या संशयावरून हा खून करण्यात आला.

रेंट अ कार चोरीच्या संशयावरून खून; तिघांना अटक, पीर्ण येथील प्रकरणाचा १५ तासांत छडा
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : पीर्ण येथील केळ परिसरातील पठारावर कपिल चौधरी (१९, रा. हाथरस, उत्तर प्रदेश) या युवकाच्या खून प्रकरणाचा उलगडा अवघ्या १५ तासांत करण्यात कोलवाळ पोलिसांनी यश मिळवले. या प्रकरणी मुख्य संशयित असलेला रेंट अ कार व्यावसायिक गुरुदत्त लवंदे (३१, रा. कांदोळी), त्याचे साथीदार डायसन कुतिन्हो (३१, कळंगुट) आणि सूरज ठाकूर (२१, कांदोळी) यांना अटक केली. या प्रकरणात आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. मृत कपिलने संशयिताकडून जीप भाड्याने घेतली होती. ती जीप चोरल्याच्या संशयावरून हा खून करण्यात आला.
खुनाचा प्रकार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आला. केळ या डोंगराळ भागात रस्त्याकडेला जखमी युवक पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कोलवाळ पोलिसांना घटनास्थळी युवक रस्त्याकडेला पडल्याचे आढळले. हा युवक मारहाणीत जखमी झाल्याचे दिसले. युवकाच्या चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या. मारहाणीने चेहराही सुजला होता. युवकाच्या खिशात पॅनकार्ड, त्याच्या पँटच्या खिशात दारूची रिकामी बाटली आढळली होती. त्याला तातडीने उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले होते.
मृत व्यक्ती कपिल चौधरी असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. कुटुंबीयांकडे चौकशी केली असता कपिलचे वडील श्रीनिवास सिंह (रा. हाथरस, उत्तर प्रदेश) यांनी आपला मुलगा गोव्याबाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. पण तो सापडत नसल्याचे आणि त्याचा फोन बंद असल्याचे सांगितले. कपिलच्या फोनचे अखेरचे लोकेशन थिवी परिसरात आढळले होते. श्रीनिवास यांना बोलावून शवागारात पडताळणी केली असता त्यांनी मुलगा कपिलचा मृतदेह ओळखला. त्यांनी कपिलची अज्ञातांनी हत्या करून मोबाइल, बॅगसह साहित्य पळवल्याची तक्रार दाखल केली.
तांत्रिक तपास आणि सूत्रांच्या आधारे कपिलने संशयित गुरुदत्त लवंदे याच्याकडून थार जीप भाड्याने घेतली होती असे समजले. तपासानंतर मुख्य संशयित गुरुदत लवंदे याला शुक्रवारी रात्री पोलिस निरीक्षक निखिल पालेकर आणि पथकाने ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याने इतर साथीदारांसह कपिलला मारल्याची कबुली दिली. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली.
कार बांद्याच्या दिशेने गेल्याचे समजल्याने पाठलाग
कपिल चौधरीने दि. ३० रोजी रेंट अ कार व्यावसायिक गुरुदत्त लवंदे याच्याकडून भाड्याने थार जीप (जीए ०३ एएच ५२५४) घेतली होती. कपिलने ही जीप दीपक ठाकूर या नावाने बोगस ओळखपत्र तयार करून भाड्याने घेतल्याचे गुरुदत्तच्या लक्षात आले. जीपला लावलेल्या जीपीएस ट्रॅकरवरून ही थार जीप गोवा सीमा ओलांडून बांद्याच्या (महाराष्ट्र) दिशेने गेल्याचे आढळले. त्यामुळे लवंदे याने मित्रांसह कारचा पाठलाग केला. आणि कपिलला कारसह कणकवलीत पकडले.
मद्यधुंद अवस्थेत असल्याचे भासवले
संशयितांनी कणकवलीमधून कपिलला थिवीत आणले. जीप चोरल्याच्या संशयावरून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारले. रात्री ११ वाजता त्याला जखमी अवस्थेत डोंगराळ भागात सोडून दिले. संशयितांनी थिवीतील एका वाईन शॉपमधून दारूची बाटली खरेदी केली. ती रिकामी करून कपिलच्या पँटच्या खिशात ठेवली. कपिल मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.