म्हादईसाठी खासदारांनी एकत्र यावे; कॅप्टन विरियातो यांचे श्रीपाद नाईक, तानावडेंना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 12:13 IST2025-03-30T12:12:14+5:302025-03-30T12:13:19+5:30
ज्वलंतप्रश्नी तोडगा काढूया, कर्नाटकातील लोकांचाही गोव्याला पाठिंबा

म्हादईसाठी खासदारांनी एकत्र यावे; कॅप्टन विरियातो यांचे श्रीपाद नाईक, तानावडेंना आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील विविध विषयांवर लढा देण्यासाठी तिन्ही खासदारांनी एकत्र येण्याची गरज आहे. उत्तर गोवा लोकसभा खासदार श्रीपाद नाईक राज्यसभा व खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आपल्यासोबत यावे, असे आवाहन दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत केले.
म्हादई व अन्य विषयांवर सर्व खासदारांनी राजकीय मतभेद दूर ठेवून एकत्र यावे. दोन्ही खासदारांनी आपण केलेले आवाहन स्वीकारावे असेही त्यांनी म्हटले आहे. नैसर्गिक आपत्ती या विषयावर बोलताना आपण संसदेत म्हादईचा प्रश्न उपस्थित केला होता.
प्रसाद योजना चांगली पण...
जुने गोवे येथील बासिलिका ऑफ बॉम जिजस चर्च परिसरातील वारसा स्थळात केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत प्रकल्प येत आहे. त्याला स्थानिकांचा विरोध आहे. सदर प्रसाद योजना ही चांगलीच आहे. मात्र त्या अंतर्गत होणारा प्रकल्प कुठे उभारला जाणार, जागेची स्थिती हेसुद्धा पाहणे गरजेचे असल्याचे मत खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी व्यक्त केले.
कर्नाटकातील लोकांचाही गोव्याला पाठिंबा
महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक येथील काही लोकांचा म्हादईचे पात्र वळवण्यास विरोध आहे. आपण तेथील एनजीओ व पर्यावरणप्रेमींशी संपर्कात आहे. त्यांचाही म्हादईसाठी गोव्याच्या लढ्याला पाठिंबा आहे. ही एक सकारात्मक गोष्ट आहे. आपण संसदेत गोव्याचे विषय नियमितपणे मांडत असून उर्वरित दोन खासदारांनी सुद्धा गोव्यासाठी आपल्यासोबत येऊन विषय मांडावेत, अशी मागणी त्यांनी केली.
प्रदेश जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा म्हणाले, काँग्रेस सोडून अन्य पक्षात पक्षांतर केलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घेतले जाणार नाही, असे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षशिस्त मोडणाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर खासदार विरियातो यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सरचिटणीस श्रीनिवास खलप उपस्थित होते.
माईक बंद
विरोधकांनाही संसदेत बोलण्यास दिले जात नाही. विरोधक जेव्हा कधी आपले मत मांडण्यासाठी, बोलण्यासाठी उभे राहतात, तेव्हा माईक बंद केला जातो. विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीतही तेच होते. सरकार विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला.