माध्यम विधेयक लटकणार!
By Admin | Updated: January 8, 2016 01:47 IST2016-01-08T01:43:34+5:302016-01-08T01:47:09+5:30
किशोर कुबल ल्ल पणजी माध्यम विधेयकावरून वातावरण तापले असल्याने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी भाजप

माध्यम विधेयक लटकणार!
किशोर कुबल ल्ल पणजी
माध्यम विधेयकावरून वातावरण तापले असल्याने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी भाजप मंत्र्यांची गुप्त बैठक घेऊन हे दुरुस्ती विधेयक पुढे न नेण्याचा सल्ला दिला.
विधानसभेत हे विधेयक आले, तरी संमत होणार नाही, याची काळजी सत्ताधारी घेतील किंवा ते लांबणीवर टाकले जाईल, अशी व्यूहरचना आहे. इंग्रजी माध्यमाच्या ज्या १३२ प्राथमिक शाळांना अनुदान चालू आहे, त्या शाळांना ते चालूच ठेवावे, हा मंत्रिमंडळाचा निर्णय पुढेही अमलात राहील. मात्र, नव्या इंग्रजी प्राथमिक शाळांना अनुदान द्यायचे नाही, असे ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
इंग्रजी शाळांना अनुदानाचा मार्ग खुला करणारे माध्यम दुरुस्ती विधेयक संमत करून दाखवाच, असे आव्हान भारतीय भाषा सुरक्षा मंचने दिल्याने भाजपने ते गंभीरपणे घेतले आहे. ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पर्रीकर या प्रश्नी हस्तक्षेपासाठी दिल्लीहून दाखल झाले. गुरुवारी अज्ञातस्थळी त्यांनी मंत्रिमंडळातील भाजप मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे सर्व मंत्री उपस्थित होते.
या बैठकीत सहभागी झालेल्या एका मंत्र्याने सांगितले की, ११ रोजी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर भाजप मंत्र्यांची या प्रश्नावर पुन्हा एकदा बैठक होणार असून रणनीती ठरणार आहे.
पर्रीकर यांनी भाजप आमदारांशीही या
प्रश्नावर स्वतंत्रपणे चर्चा केली.
दरम्यान, ‘भाभासुमं’ने विधेयकाला
विरोध करीत येत्या रविवारी १० रोजी
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पणजीत महामेळावा आयोजित केला आहे.