पणजीचे महापौर, मडगावच्या नगराध्यक्षांनी दिल्लीत कचरा प्रकल्पाची केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 02:51 PM2019-10-24T14:51:22+5:302019-10-24T14:56:20+5:30

पणजी महापालिकेचे महापौर उदय मडकईकर, मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा बबिता प्रभुदेसाई तसेच पालिका अधिकाऱ्यांनी दक्षिण दिल्ली महापालिकेच्या पाच टनी बायोमेथानेशन कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली.

Mayor Uday Madkaikar, Margao municipality chairperson Babita Prabhudesai visited Delhi Garbage plant | पणजीचे महापौर, मडगावच्या नगराध्यक्षांनी दिल्लीत कचरा प्रकल्पाची केली पाहणी

पणजीचे महापौर, मडगावच्या नगराध्यक्षांनी दिल्लीत कचरा प्रकल्पाची केली पाहणी

Next

 पणजी - पणजी महापालिकेचे महापौर उदय मडकईकर, मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा बबिता प्रभुदेसाई तसेच पालिका अधिकाऱ्यांनी दक्षिण दिल्ली महापालिकेच्या पाच टनी बायोमेथानेशन कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाची कार्यपद्धती तसेच इतर माहिती जाणून घेण्यात आली. या भेटीनंतर लोकमतशी बोलताना महापौर मडकईकर म्हणाले की, पणजीतही अशाच प्रकारचे पाच लहान कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून ही पाहणी आणि घेतलेली माहिती महत्त्वाची ठरली आहे. 

पणजीतील ओला कचरा साळगाव येथे अडविण्यात आल्यानंतर शहरात ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या निर्माण झाली होती. प्रत्युत्तर म्हणून नंतर महापालिकेनेही साळगावहून येणारे सांड पाण्याचे टँकर्स अडविले. या प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना हस्तक्षेप करावा लागला होता व त्यानंतर त्यांनी लहान कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या दृष्टिकोनातून पालिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले होते. 

शिष्टमंडळाबरोबर पालिका प्रशासन खात्याचे संचालक आयएएस अधिकारी तारिक थॉमस हेही सोबत गेले आहेत. दिल्लीच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी हा प्रकल्प बांधण्यात आला असून केंद्रीय नागरी व्यवहार मंत्रालयाच्या शहर विकास निधीतून या प्रकल्पासाठी निधी मिळालेला आहे. दक्षिण दिल्ली महापालिकेने हा प्रकल्प बांधला त्यावेळी १ कोटी ७४ लाख रूपये खर्च आला होता. रोज अडीच किलोवॅट वीज निर्मिती व ७५० किलो सेंद्रिय खताची निर्मिती या प्रकल्पातून होते.

दिल्ली भेटीवर गेलेल्या शिष्टमंडळात मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर, पालिका अभियंते, गोवा घन कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापक शशांक देसाई, डॉमनिक फर्नांडिस, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रवीण फळदेसाई आदींचा समावेश आहे. शिष्यमंडळ दिल्लीच्या वरील प्रकल्पाची पाहणी करून सायंकाळी गोव्यात परतणार आहे.

 

Web Title: Mayor Uday Madkaikar, Margao municipality chairperson Babita Prabhudesai visited Delhi Garbage plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.