मराठी भाषेने संशोधनात भक्कम काम करावे; मुख्यमंत्र्यांची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:13 IST2026-01-10T13:12:23+5:302026-01-10T13:13:04+5:30
जागतिक मराठी अकादमीच्या 'शोध मराठी मनाचा' संमेलनाचे उद्घाटन; भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

मराठी भाषेने संशोधनात भक्कम काम करावे; मुख्यमंत्र्यांची अपेक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरले आहे. काळानुसार मराठी अधिक प्रगल्भ होत गेली आहे. सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे मातृभाषेतून शिक्षणाला नवे बळ मिळाले आहे. आता मराठी आणि कोकणी या भाषांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, अनुवाद प्रणाली यांसह संशोधनाच्या क्षेत्रात अधिक भक्कमपणे काम करण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
जागतिक मराठी अकादमीने गोवा राज्य आयोजन समितीच्या सहाय्याने कला अकादमीत शुक्रवारी आयोजित केलेल्या 'शोध मराठी मनाचा' या संकल्पनेवर आधारित २१ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष तथा शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ उद्योजक अनिल खंवटे, ज्येष्ठ अभिनेता तथा दिग्दर्शक महेश मांजरेकर, कवी-दिग्दर्शक नागराज मंजुळे, कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर, जागतिक मराठी अकादमीचे यशवंतराव गडाख-पाटील, उदय लाड, - जयराज साळगांवकर, दशरथ परब, प्रा. अनिल सामंत व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, 'माझ्या गोव्याच्या भूमीत, गड्या नारळ मधाचे' या बा. भ बोरकर यांच्या कवितेतून गोव्याच्या आत्म्याचे दर्शन होत असते. त्यांच्या या कवितेतून राज्याच्या मातीत आणि इतिहासात मराठी कशी पूर्णपणे रुजली आहे हे दिसते. शब्दांतून संस्कृती आणि विचार मुक्तपणे फुलतात, अशा भूमीत मराठी मनाचा वेध घेण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो आहोत. जागतिक मराठी साहित्य संमेलन हा एक केवळ कार्यक्रम किंवा औपचारिक उपक्रम नाही तर तो मराठी समाजाच्या वैचारिक परंपरेतील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामधून सुसंस्कृत चर्चा घडते, नवे विचार जन्माला येतात व भविष्याची नवीन दिशा ठरते. आणि मग आवश्यक बदलाची प्रक्रिया सुरू होते.'
पुरस्काराने सन्मान
याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना कला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्योजक अनिल खंवटे यांना जागतिक मराठी भूषण सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर, डॉ. प्रकाश प्रभुदेसाई, डॉ. शिरीष बोरकर आणि अशोक परब यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले, 'वेळोवेळी बदलत गेलेल्या साहित्याने मराठी भाषेला सतत नवे रूप दिले आहे. सामान्य लोकांची मराठी भाषा अनुभवातून विस्तारली आहे. ग्रामीण भागातील लोकगीते, ओव्या, पोवाडा तसेच शहरातील नाते-संवाद आणि कथाकथन आणि लोककला या सर्व माध्यमांतून सामान्य माणसाने मराठी भाषेचा चेहरा घडवला आहे.
आपले दुःख, आनंद, संघर्ष अशा भावना व्यक्त करणाऱ्या सामान्य माणसाने नेहमीच मराठी शब्दाचा आधार घेतला आहे. त्यामुळे मराठी भाषा समाजाच्या भावनाशी आणि वास्तव्याशी गट जोडलेली आहे.'
मराठीला राजभाषा दर्जाची अपेक्षा
कार्याध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी गोव्यात मराठी आणि कोकणी संस्कृती परस्परपूरक असून हातात हात घालून नांदत असल्याचे सांगितले. भविष्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणच गरजेचे : अनिल काकोडकर
अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, 'प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून होणे गरजेचे आहे, तरच मोठेपणी संपर्कक्षेत्र विस्तारण्यासाठी याचा उपयोग होतो. आजच्या काळात डिजिटल साक्षरता ही मुलभूत बाब झाली आहे. तंत्रज्ञानाने अनेक सुविधा निर्माण केल्या असल्या तरी यातून अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. विशेषतः मुलांच्या बाबतीत. माझ्या मते तंत्रज्ञान बरे की वाईट हे वापरकर्त्यांच्या मानसिक जडणघडणीवर आधारित आहे. शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन, डिजिटल साक्षरता आणि विद्यार्थी-केंद्रित पद्धती विकसित करणे अत्यावश्यक आहे. ग्रामीण भागाचा आर्थिक विकास, तंत्रज्ञानाधारित उद्योग आणि वर्क फ्रॉम व्हिलेज यांसारख्या संकल्पनांना बळ दिले पाहिजे.'