९-१० ऑगस्टला मराठी चित्रपट महोत्सव; अक्षय कुमार यांची प्रमुख उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 09:27 IST2025-07-12T09:26:26+5:302025-07-12T09:27:18+5:30

हे कलाकार येणार

marathi film festival on august 9 and 10 akshay kumar to be the chief guest | ९-१० ऑगस्टला मराठी चित्रपट महोत्सव; अक्षय कुमार यांची प्रमुख उपस्थिती

९-१० ऑगस्टला मराठी चित्रपट महोत्सव; अक्षय कुमार यांची प्रमुख उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : यंदाचा १४ वा 'गोवा मराठी चित्रपट महोत्सव २०२५' येत्या ९ व १० ऑगस्ट रोजी पणजीत होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमारच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक विन्सन वर्ल्डचे अध्यक्ष संजय शेट्ये यांनी दिली. ९ रोजी सकाळी ९.३० वाजता आयनॉक्समध्ये उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोबत श्रीपाद शेट्ये, सचिन चाटे, उदय म्हांबरे पस्थित होते. संजय शेट्ये म्हणाले, या महोत्सवात पंधराहून अधिक मराठी चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच सादर होणारे चित्रपट, प्रेक्षकप्रिय चित्रपट तसेच गोव्यात प्रथमच दाखवले जाणारे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना त्यांच्या पाच दशकांहून अधिक काळाच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल महोत्सवात 'कृतज्ञता सन्मान' प्रदान करण्यात येणार आहे.

राज्यातील रसिक प्रेक्षकांना विविध विषयांवर आधारित उत्कृष्ट मराठी चित्रपट दाखवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. केवळ चित्रपट दाखवणे नव्हे, तर प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांशी संवाद साधण्याची संधी देणे हा महोत्सवाचा खरा आत्मा आहे. यावर्षी, आम्ही एआयद्वारे कंटेंट तयार करण्यासाठी एआयच्या वापरावर एक कार्यशाळा देखील आयोजित करणार आहोत. ही कार्यशाळा ८ ऑगस्ट रोजी शुक्रवारी आयोजित केली जाईल आणि ती सर्वांसाठी खुली असेल.

यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात गोमंतकीय निर्मात्यांनी निर्माण केलेले दोन लघुपट दाखवण्यात येतील. वास्को येथील तरुण निर्माता शर्व शेट्ये यांनी निर्माण केलेला 'कर्ज' हा हिंदी लघुपट. त्याचबरोबर गेल्या वर्षी इफ्फीत प्रदर्शित झालेला किशोर अर्जुन निर्मित 'एक कप च्या' हा कोंकणी लघुपट प्रदर्शित केला जाईल. ऑनलाइन नोंदणी लवकरच 'बुर्रा' नावाच्या अॅप वेबसाईटवर सुरू होईल. तर प्रत्यक्ष नोंदणीसाठी २० जुलैपासून सुरू होणार आहे.

हे कलाकार येणार

गोवा मराठी चित्रपट महोत्सवात यंदा प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, गजेंद्र अहिरे, मृणाल कुलकर्णी, छाया कदम, किशोर कदम, मिलिंद शिंदे, जितेंद्र जोशी, रोहिणी हटंगडी, आदिनाथ कोठारे, सुबोध भावे, सई ताम्हणकर, ओम भूतकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, निकिता दत्ता, अमृता सुभाष यांच्यासह अनेक कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी महोत्सवात सहभागी होणार आहेत.

प्रत्यक्ष नोंदणीसाठी याठिकाणी सुविधा

पणजी : विन्सन ग्राफिक्स, गेरा इम्पेरियम २, कार्यालय क्रमांक ३०९, पाटो.

वास्को : विन्सन ग्राफिक्स, हॉटेल अनंताश्रमजवळ.

मडगाव : माया पुस्तक भांडार, विट्रोस मॅन्शन, इसिडोर बाप्तिस्ता मार्ग.

फोंडा : मोहक डिझायनर्स, नूतन औषधालयासमोर.

 

Web Title: marathi film festival on august 9 and 10 akshay kumar to be the chief guest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.