गोव्यात मराठा समाजाचा इतिहास मोठा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 09:38 IST2025-12-28T09:37:04+5:302025-12-28T09:38:00+5:30
अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या पर्वरी येथील नव्या भव्य मराठा संकुलाचे थाटात उद्घाटन

गोव्यात मराठा समाजाचा इतिहास मोठा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : गोव्याच्या इतिहासात मराठा समाजाचा इतिहास खुप मोठा आहे. राज्यात खऱ्या अर्थाने धर्मपरिवर्तनावरील उठाव आणि मंदिरांचे संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराजांनीच केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या पर्वरी येथील मराठा भवनच्या नव्या संकुलाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार राजेश फळदेसाई, आमदार उल्हास तुयेकर, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष सुहास फळदेसाई व इतर उपस्थित होते.
मी मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातील लोकांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. माझ्या कार्यकाळात मला नार्वेतील सप्तकोटेश्वर मंदिराचे सुशोभिकरण करता आले. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण असलेले हे पुरातन मंदिर आहे. दुसरे म्हणजे कुंकळ्ळीचा उठाव झाला तो दिवस म्हणजे १५ जुलैला राज्य मान्यता दिली. तसेच नाणूस येथील दीपाजी राणेंचा किल्ला परिसरात २६ जानेवारीला खास कार्यक्रम आणि किल्ल्याचे जतन करण्याचा निर्णय ही तीन महत्त्वाची कामे करायला मिळाली, असेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मराठा संकुलाचा लाभ घ्या : मुख्यमंत्री
अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे काम चांगले आहे. पर्वरी येथे उभारण्यात आलेले हे संकुल मराठा समाजाच्या लोकांना खूप लाभदायक ठरणार आहे. तसेच या संकुलात मराठा समाजाच्या मुलांना उच्च शिक्षणाचे धडे देणारे प्रशिक्षण देण्याचा निर्णय तसेच इतर कामासाठी समाजाच्या लोकांना २० टक्के सूट ही खूप उपयोगी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
हे संकुल म्हणजे आमचा अभिमान : सुभाष फळदेसाई
अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे पर्वरी येथील मराठा भवन आमचा अभिमान आहे. अनेक वर्षे पाहिलेले स्वप्न साकार झाले आहे. यासाठी अनेकांनी सहकार्य केले. आमच्या मराठा बांधवाच्या सहकार्याने हे संकुल उभे राहिले आहे. आता या संकुलाद्वारे जो निधी तयार होणार आहे तो आमच्या समाजाच्या हितासाठी वापरला जाणार असल्याचे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले.
वीरेंद्र गावकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
या सोहळ्यात अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचा महत्त्वाचा असलेला जीवनगौरव पुरस्कार डॉ. विरेंद्र नाईक गावकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच मुख्यमंत्री सावंत यांच्या मातोश्रींच्या स्मरर्णाथ दिला जाणारा पद्मिनी जिजामाता पुरस्कार संगीता परब यांना देण्यात आला. यावेळी गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे डॉक्टर, शिक्षक तसेच इतर क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.