मंत्र्यांना अडवल्याप्रकरणी मनोज परब यांच्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:11 IST2025-10-01T14:10:14+5:302025-10-01T14:11:20+5:30
कोलवाळ पोलिसांकडून स्थानकात बोलावून चौकशी

मंत्र्यांना अडवल्याप्रकरणी मनोज परब यांच्यावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : थिवीचे आमदार तथा मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना पीर्ण येथे जीएसटीचा प्रचार उत्सवादरम्यान अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे नेते, मनोज परब यांच्या विरोधात कोलवाळ पोलिसांनी सरकारतर्फे तक्रार दाखल केली. यानंतर परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी त्यांना पोलिस स्थानकावर बोलावून याप्रकरणी कसून चौकशी करण्यात आली.
पीर्ण येथे घडलेल्या या प्रकाराबाबत आरजीच्या अन्य काही कार्यकर्त्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात, शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार घडला होता. याबाबत गुन्हा दाखल करून चौकशीसाठी परब यांना मंगळवारी पोलिस स्थानकात हजर राहण्यास बजावण्यात आले होते. तक्रारीची प्रत देऊन मंगळवारी सकाळी १० वाजता पोलिस स्थानकात हजर राहण्यास सांगितले होते, असेही परब म्हणाले.
कोलवाळ स्थानकावर परब यांच्यासोबत आमदार विरेश बोरकर यांसह इतर कार्यकर्ते आले होते. पोलिसांच्या चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना परब यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, पीर्ण येथील रस्ता रुंदीकरणाविषयी पंचायतीच्या ग्रामसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर मंत्री हळर्णकर यांना ग्रामसभेत उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र पंचायतीने पाठवले होते. तरीसुद्धा ते ग्रामसभेत आले नसल्याने त्यांना प्रश्न करणे हा आमचा अधिकार होता. रस्ता रुंदीकरणाच्या प्रलंबित मुद्यावरून मंत्री हळर्णकर यांना प्रश्न विचारायचे होते. आमदार विरेश बोरकर यांनी राज्यात हुकूमशाही सुरू असल्याचे सांगत सरकारचा निषेध केला. यापूर्वीसुद्धा बोगस तक्रारी नोंद करण्याचे प्रकार घडले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
परब यांच्याविरुद्ध सूडबुद्धीनेच गुन्हे : युरी
रिव्होल्यूशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणे हे भाजप सरकारच्या राजकीय सूडबुद्धीचे स्पष्ट उदाहरण आहे. प्रत्येक पावलावर निराश झालेले हे अकार्यक्षम सरकार विरोधी पक्षांना धमकावण्यासाठी पोलिस आणि इतर सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहे. मी भाजपच्या अशा खालच्या दर्जाच्या राजकारणाचा तीव्र निषेध करतो, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.