मांडवी एक्स्प्रेस बनली ‘हेल्दी एक्स्प्रेस’!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 09:24 PM2019-09-16T21:24:11+5:302019-09-16T21:25:33+5:30

स्वच्छ, दर्जेदार आणि स्वादिष्ट जेवणाची पर्यटकांना भुरळ

Mandovi Express becomes Healthy Express due to quality and hygienic food | मांडवी एक्स्प्रेस बनली ‘हेल्दी एक्स्प्रेस’!

मांडवी एक्स्प्रेस बनली ‘हेल्दी एक्स्प्रेस’!

googlenewsNext

- सचिन कोरडे 

रेल्वेतील जेवण? नको रे बाबा... अशीच प्रतिक्रिया बहुतेक प्रवाशांची असते. कारण त्यांचा तसा अनुभव असतो. रेल्वेतील जेवणाचा आणि खाद्यपदार्थांचा दर्जा आजही सुधारलेला नाही. परंतु, याला अपवाद ठरते ती कोकणातील मांडवी एक्स्प्रेस. १०१०४, १०१०३ या रेल्वेगाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी येथील कॅटरर्सच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला तर त्यांना आश्चर्यच वाटेल. अत्यंत स्वच्छ, दर्जेदार आणि स्वादिष्ट अशा खाद्यपदार्थांमुळे ही मांडवी एक्स्प्रेस आता ‘हेल्दी एक्स्प्रेस’ म्हणून ओळखली जात आहे. याचा अनुभव खुद्द ‘लोकमत’ टीमने घेतला.  

देशातील कोट्यवधी लोक रोज रेल्वेने प्रवास करतात. लांब प्रवास करताना रेल्वेतील खाद्यपदार्थ किंवा स्थानकावरील पदार्थ खाण्याशिवाय पर्याय नसतो. नाकं मुरडत का होईना प्रवासी हे पदार्थ घेतात. रेल्वेत कधीही चांगले पदार्थ मिळत नाहीत, असा त्यांचा अनुभव असतो. त्यामुळेच बरेच प्रवासी प्रवासाला निघताना घरगुती जेवण सोबत नेणेच पसंत करतात. मात्र, तुम्ही मांडवी एक्स्प्रेसने गोव्याहून-मुंबई किंवा मुंबईवरून गोव्याला येत असाल तर तुम्ही खाण्याची चिंताच करू नका. या रेल्वेगाडीत सर्वच पदार्थ स्वादिष्ट मिळतील तेही पंचतारांकित पँट्रीत तयार झालेले. याचे सर्व श्रेय जाते ते येथील कॅटरर्सच्या मालकाला. राजू आहूजा हे मांडवी एक्स्प्रेसला गेल्या ३० वर्षांपासून कॅटरिंगची सेवा पुरवतात. रेल्वेतील जेवणाचा दर्जा कसा सुधारता येईल, यावर ते दिवसेंदिवस अभ्यास करतात आणि म्हणूनच केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी स्वत: आहुजा परिवाराचे कौतुक केले आहे. रेल्वेमंत्र्यांनी सुद्धा मांडवी एक्स्प्रसेमधील पदार्थांची चव चाखली आहे. मुंबईला जाण्यासाठी किंवा मुंबईहून परतण्यासाठी मांडवी आणि कोकण कन्या एक्स्प्रेसची निवड करणाऱ्यांची संख्या जी ४० टक्क्यांवर पोहोचली आहे ती यामुळेच.

हे आहेत मेन्यू
रेल्वेत प्रवशांना आरोगयदायी पदार्थ मिळावेत, असा प्रयत्न प्रशासनाचा आहे. परंतु, ते सर्वच रेल्वेगाड्यांत प्रत्यक्षात उतरले नाही. मांडवी एक्स्प्रेसमध्ये मात्र तुम्हाला सर्वकाही ‘हेल्दी’ मिळेल आणि खाल्ल्यावर समाधानही. या रेल्वेतील मेन्यू असे :
नाश्ता : पोहा, उपीट, फ्रुट्स सॅलेड्स, ग्रीन सॅलेड्स, दूध, कॉफी, ग्रीन टी, ताक किंवा दही, इडली, डोसा, टोमॅटो सूप, गुजराती दाबेली, मेथी वडा, मेथी भजी, समोसा, चाट, मिसळ, शिरा.
जेवण : शाकाहारी आणि मांसाहारी थाळी, शाकाहारी आणि मांसाहारी पुलाव, फिश थाळी, रवा फ्राय मासे, चिकन लॉलीपॉप, पुरी भाजी, चपाती भाजी, गुलाब जाम, आईसक्रीम, श्रीखंड व चायनिज पदार्थ.

किंमत वाढवा, दर्जाही सुधारेल..
भारतीय रेल्वेतील जेवण म्हणजे स्वस्त, असे समीकरण आहे. त्यामुळे रेल्वेतील खाद्यपदार्थांचे रेट वाढवले तर ते प्रवाशी मान्य करत नाहीत आणि रेल्वे प्रशासनालाही ते मान्य होत नाही. त्यामुळे कंत्राटदार स्वस्त देण्याचा प्रयत्नात खाद्यपदार्थांच्या दर्जाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. कधी कधी तर हा व्यवसाय ना नफा ना तोटा या तत्वावरही करावा लागतो. उदा. एका थाळीसाठी आम्हाला ५० रुपये खर्च येत असेल तर रेल्वे आम्हाला ती ७० रुपयांत द्या, असे सांगते. तेव्हा आम्हाला केवळ २० रुपये मिळतात. त्यातूनही लेबर चार्ज वगळला तर काहीच उरत नाही. त्यामुळे दर्जा सुधारणार कसा? मग कॅटरर्स दर्जाचा विचार करतील का? ज्यांना कंत्राट मिळाले त्यांना ते कायम असेल असेही नाही?, असा प्रश्न आहुजा यांनी उपस्थित केला. रेल्वेतील खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारायचा असेल तर किंमतही वाढवायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
 
रेल्वेमंत्र्यांनी बोलावून घेतले होते

रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे मला अत्यंत परिचित आहेत. ते बेळगावकडे नेहमी येत असतात. मांडवी एक्स्प्रेसने प्रवास करतात. त्यामुळे त्यांनी माझ्या कॅटरर्सच्या पदार्थांची चव बऱ्याचदा चाखली आहे.  त्यांनाही आश्चर्य वाटते. इतर रेल्वेगाड्यांतही असेच पदार्थ मिळावेत, अशी इच्छा त्यांनी अनेकदा व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी माझा सल्ला पण मागितला होता. मात्र, सगळ्याच कंत्राटदारांना असे करणे शक्य होत नाही. मी सुद्धा त्यांना पदार्थांचे दर वाढवण्याचा सल्ला दिला आहे.  
 

 

Web Title: Mandovi Express becomes Healthy Express due to quality and hygienic food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.