'माझे घर' योजना एक निवडणूक स्टंट: अमित पाटकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:19 IST2025-10-17T09:18:33+5:302025-10-17T09:19:14+5:30
साखळीत 'मतचोरी' प्रकरणाची जागृती

'माझे घर' योजना एक निवडणूक स्टंट: अमित पाटकर
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : सध्या राज्यात गोमंतकीय आपल्याच घरात सुरक्षित नसून मुख्यमंत्री राज्यभर 'माझे घर' योजनेच्या प्रचारासाठी फिरत आहेत. माझे घर हा एक निवडणूक स्टंट आहे, काँग्रेस पक्ष सामान्य जनतेचा असून सर्वसामान्य विषय घेऊन लोकांना न्याय देण्यासाठी झटणारा पक्ष आहे. आज देशभरात सुरू असलेल्या 'मतचोरी' प्रकरणाची जागृती करून निवडणूक आयोगाला निवेदन पाठविण्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला लोकांकडून प्रतिसाद लाभत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी साखळी येथे सांगितले.
साखळीत आयोजित 'मतचोरी' सह्यांच्या मोहिमेत गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, साखळी गटाध्यक्ष राजेश सावळ, महिला अध्यक्षा गौरी गावस, अल्पसंख्याक अध्यक्षा झरीन शेख, महिला नेत्या रेणुका देसाई, माजी नगरसेवक राजेंद्र आमेशकर व इतरांची उपस्थिती होती. साखळी बसस्थानक परिसर, बाजारात फिरून लोकांमध्ये जागृती करत सह्या घेतल्या. काँग्रेस पक्ष देशभरातून ५ कोटी सह्यांचे निवेदन केंद्रीय निवडणूक आयोगाला देणार आहे. गोव्यात २ लाख सह्यांचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचेही अमित पाटकर यांनी सांगितले.