Lok Sabha Election 2019 : गोव्यात काँग्रेसचा प्रचार ‘इको फ्रेंडली’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 20:04 IST2019-03-22T19:43:46+5:302019-03-22T20:04:05+5:30
सायकल यात्रेने होणार प्रारंभ

Lok Sabha Election 2019 : गोव्यात काँग्रेसचा प्रचार ‘इको फ्रेंडली’
पणजी : गोव्यात काँग्रेसने पर्यावरणाविषयी कळवळा दाखवत सायकल यात्रेने लोकसभा प्रचाराला आरंभ करण्याचा संकल्प सोडला असून प्रचारालाही ‘इको फ्रेंडली’ वळण देऊन लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. सायकल वापरामुळे प्रदूषण तर टाळता येईलच शिवाय लोकांशी थेट कनेक्ट होता येईल, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे म्हणणे आहे.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचा प्रचार येत्या रविवार २४ पासून हळदोणे येथून ‘सायकल यात्रे’ने सुरु होणार आहे. ‘चलो गांव चलें’ ही संकल्पना असून ३0 रोजी या सायकल यात्रेची सांगता डिचोली येथे होणार आहे. २४ रोजी सकाळी १0 वाजता हळदोणेत यात्रा सुरु होईल. पहिल्या दिवशी हळदोणेसह म्हापसा व थिवी विधानसभा मतदारसंघात, २५ रोजी मांद्रे, पेडणे व शिवोली विधानसभा मतदारसंघात, २६ रोजी साळगांव, कळंगुट व पर्वरी विधानसभा मतदारसंघात, २७ रोजी पणजी, ताळगांव आणि सांताक्रुझ विधानसभा मतदारसंघात २८ रोजी सांत आंद्रे, कुंभारजुवें व प्रियोळ विधानसभात मतदारसंघात, २९ रोजी वाळपई आणि पर्ये विधानसभा मतदारसंघात तर ३0 रोजी साखळी, मयें आणि डिचोली विधानसभा मतदारसंघांमध्ये ही सायकल यात्रा होईल. या मतदारसंघांमध्ये सायकल यात्रेनंतर जाहीर सभांचेही आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे बावटा दाखवून यात्रेचा शुभारंभ करणार असून सभांमध्येही संबोधतील. ३0 ते ४0 सायकलस्वार यात्रेत असतील आणि प्रत्येक ठिकाणी त्या त्या मतदारसंघातील आणखी ५0 ते १00 सायकलस्वार सहभाग घेतील.