जुने-नवे भेद न करता पक्षासाठी एकदिलाने काम करू; भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:08 IST2025-04-04T12:07:49+5:302025-04-04T12:08:42+5:30
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही केले वाळपईतील पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन

जुने-नवे भेद न करता पक्षासाठी एकदिलाने काम करू; भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगावः समाजातील शेवटचा घटकापर्यंत अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी पोहोचाव्यात म्हणून प्रधानमंत्री १८ तास काम करतात. त्यांच्या कामापासून ऊर्जा घेऊन तळागाळातील मंडळ समिती, बूथ समिती पदाधिकाऱ्यांनी कार्यरत व्हावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण व्हावे म्हणून मावळ्यांना बरोबर घेऊन अन्यायाचा प्रतिकार केला. तसेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. जुने नवे असा भेद न करता कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्यरत रहावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी वाळपई येथे केले.
वाळपई नगरपालिका सभागृहामध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दयानंद कारबोटकर, आशिष शिरोडकर, रुपेश कामत, वाळपई मंडळ अध्यक्ष रामू खरवत, विनोद शिंदे, प्रसाद खाडिलकर, मिलिंद गाडगीळ, नगराध्यक्ष प्रसन्न गावस, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच, नगरसेवक, नवीन समिती सदस्य उपस्थित होते.
नाईक म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय, शामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघातून भाजपची स्थापना केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांनी पक्ष बांधणीसाठी, तळागाळापर्यंत नेण्यासाठी अविरत श्रम घेतले. तसेच गोव्यामध्ये श्रीपाद नाईक, मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, राजेंद्र आर्लेकर यांच्यासारख्या नेत्यांनी प्रवासाची कोणतीही साधने किंवा सुख सोयी नसताना संपूर्ण राज्यभर प्रवास करून पक्षाचे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी श्रम घेतले. तुलनेने आज सामान्य कार्यकर्त्याला आधुनिक साधनांमुळे पक्ष कार्य करणे सोपे झालेले आहे. पूर्वी जेव्हा आम्ही पक्ष कार्यासाठी घरोघरी पायी चालत जात होतो. त्यावेळी थट्टा केली जात होती.
सुरुवातीस ढोलताशांच्या गजरात प्रदेशाध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. दीप प्रज्वलन व भाजपाचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय व शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक नूतन समिती अध्यक्ष रामू खरवत यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद गाडगीळ यांनी केले. तर रामनाथ डांगी यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या स्वप्नातील भारत साकारूया: मंत्री राणे
यावेळी बोलताना आरोग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, दामू नाईक यांच्या सारखा सामान्य आणि बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता पक्षाला अध्यक्ष म्हणून मिळाला आहे. त्याचा फार आनंद आहे. त्यांच्या कारकिर्दीत येणाऱ्या कार्यकाळामध्ये राज्यात पक्ष मजबूत होईल यात शंका नाही. विकास कामे होत आहेत, होतच राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी सर्वांनी एकजुटीने, एक दिलाने पक्ष कार्य करून संघटना मजबूत करुया अंत्योदय तत्त्वाने समाजातील वंचित घटकापर्यंत सरकारच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्याची वचनबद्ध होऊया.