चला, हरित गोवा संकल्प करूया; पर्यावरण संवर्धनासाठी एक होऊया!; मुख्यमंत्र्यांची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 07:14 IST2025-06-06T07:12:12+5:302025-06-06T07:14:00+5:30

खारफुटी, खाजन जमिनीच्या अहवालासोबत किनाऱ्यांचाही अभ्यास सुरू

let us make a green goa resolution let us unite for environmental conservation said cm pramod sawant | चला, हरित गोवा संकल्प करूया; पर्यावरण संवर्धनासाठी एक होऊया!; मुख्यमंत्र्यांची हाक

चला, हरित गोवा संकल्प करूया; पर्यावरण संवर्धनासाठी एक होऊया!; मुख्यमंत्र्यांची हाक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील पर्यावरणाचे संवर्धन कसे करता येईल, पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार आम्ही राज्य पर्यावरण अहवाल जाहीर केला आहे. या व्यतिरिक्त खारफुटी बाबतचा अहवाल देखील तयार केला आहे. सध्या किनाऱ्याची होणारी धूप नियंत्रणात आणण्याचा अभ्यास सुरू असून हरित गोवा साकारण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पर्यावरण खात्यातर्फे आयोजित पर्यावरण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्यासोबत राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, पर्यावरण खात्याचे सचिव अरुण कुमार मिश्रा व संचालक सचिन देसाई उपस्थिती होते.

खाजन जमिनींचे व्यवस्थापन आम्ही पहिल्यांदाच लोकांसमोर ठेवू शकलो. यातून खाजन जमिनी संदर्भातील समस्या जाणून घेण्यास मदत होईल व उपाययोजनाही करता येतील. म्हणून हा आराखडा देखील आम्ही लोकांसमोर ठेवला. खारफुटी वाचविण्याचे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे ध्येय ठेऊनच हा अहवाल आम्ही तयार केला, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले. प्लास्टिकचा जेव्हा शोध लागला होता तेव्हा सर्वांना आनंद झाला होता. पण त्याची विल्हेवाट करण्याबाबत जास्त विचार झाला नाही. आता प्लास्टिक नष्ट करण्यासाठी उपाय शोधणे सुरू आहे. प्लास्टिकच्या वापरात गोवा देशातील इतर राज्यांमध्ये खालून तिसऱ्या क्रमांकावर आहे, ही चांगली गोष्ट आहे. प्लास्टिक मुक्त गोवा है आतापर्यंत कागदावरच असून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी लोकांची साथ आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

गोवा हे नितळ राज्य आहे, हरित क्रांती आणण्यावर दिला भर. साळगाव आणि काकोडा येथील बायोमेट्रिक कचरा प्रकल्प अनेकांसाठी प्रेरणादायी. किनारी भागात आणि महत्त्वांच्या शहरात सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट प्लांट प्रस्थापित केले. आम्ही नदीत टाकलेले प्लास्टिक मासे खातात आणि ते मासे आम्ही खातो म्हणजे अप्रत्यक्ष आम्ही प्लास्टिक खातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत ते फिट इंडिया मोहीम चालवून भविष्यातील भारताची निव ठेवली. राज्यात या मोहिमंतर्गत आम्ही पर्यावरण रक्षणासाठी काम केले.

प्लास्टिक बंदी स्वतः पासून सुरू करा

सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, घरातले प्लास्टिक काढून रस्त्यावर टाकणे जोपर्यंत आपण बंद करत नाही तोपर्यंत आपले राज्य प्लास्टिक मुक्त होणार नाही. प्लास्टिक मुक्त गोवा हे आपल्याच हातात आहे. आपण आपला विचार बदलणे आवश्यक आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची धास्ती

राज्याला प्रदूषणमुक्त करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळची स्थापना करण्यात आली आहे. पण अनेक उद्योजकांना वाटते की प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यांच्या मागेच लागले आहे. त्यांच्या कामात अडथळा निर्माण करत आहे, पण असे काहीच नसून ते केवळ प्रदूषण मुक्त राज्य या ध्येयाच्च्या मागे आहे. या मंडळाच्या मदतीने राज्य प्लास्टिक व प्रदुषण मुक्त होण्याचा वाटेवर आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.

 

Web Title: let us make a green goa resolution let us unite for environmental conservation said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.