श्री गणेश जयंतीचे महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 07:19 IST2026-01-22T07:16:46+5:302026-01-22T07:19:10+5:30
श्री गणेशाची उपासना म्हणजे बाह्य उत्सवापुरती मर्यादित कृती नसून, अंतःकरणातील विकार दूर करून विवेकबुद्धी जागृत करण्याची साधना आहे.

श्री गणेश जयंतीचे महत्त्व
संकलन- तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था
माघ शुद्ध चतुर्थी दिवशी श्री गणेश लहरी प्रथम पृथ्वीवर अवतरल्या, म्हणून हा दिवस 'श्री गणेश जयंती' म्हणून साजरा केला जातो. इंग्रजी महिन्यानुसार यावर्षी २२ जानेवारीला श्री गणेश जयंती आहे. चतुर्थी तिथीला श्री गणेश तत्त्व अधिक कार्यरत असल्याने या दिवशी केलेली पूजा, आरती, स्तोत्रपठण व नामजप भक्ताला अधिक आध्यात्मिक लाभ देतो.
गणेश जयंती अन् गणेश चतुर्थी यातील नेमका फरक माहिती आहे का? पुराण कथा वाचा, संभ्रम दूर करा!
सनातन धर्मानुसार प्रत्येक देवता ही केवळ पूजेची प्रतिमा नसून ती एक चैतन्यमय, सूक्ष्म तत्त्व आहे. श्री गणेशाची उपासना म्हणजे बाह्य उत्सवापुरती मर्यादित कृती नसून, अंतःकरणातील विकार दूर करून विवेकबुद्धी जागृत करण्याची साधना आहे. श्री गणेश जयंतीचा अधिक लाभ होण्यासाठी पूजेच्या प्रारंभी मन एकाग्र करून नम्र भावाने प्रार्थना करावी. "हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती शुद्ध भक्तिभाव निर्माण होऊ दे. या पूजेतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे."
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
श्री गणेशाला अनामिकेने गंध लावावे. श्री गणेशाच्या आज्ञा चक्राच्या स्पर्शाने आपल्या मनातील खळबळ स्थिरावली असून आपले मन शांत झाले आहे, असा भाव ठेवावा. अंगठा व अनामिका यांच्या चिमटीत प्रथम हळद आणि नंतर कुंकू घेऊन श्री गणेशाच्या चरणावर अर्पण करावे. या मुद्रेमुळे पूजकात भक्तिभाव जागृत होतो. श्रीगणेशाला लाल जास्वंद वा अन्य लाल फुले शंकरपाळ्याच्या रचनेत वहावी. फुले वाहताना मनात श्री गणेशाच्या तेजस्वी तत्त्वाचे स्मरण करावे.
श्री गणेश त्याचे तेज आपल्याला या लाल फुलांच्या माध्यमातून देत आहे असे अनुभवावे. कोवळ्या दुर्वा वाहताना, आपल्या मनातील कोमलता आणि नम्रता अर्पण होत आहे, असा भाव असावा. श्री गणेश पूजनात चंदन, केवडा किंवा चमेली गंधाची उदबत्ती असावी. श्री गणेशाला हीना गंधाचे अत्तर अर्पण करावे.
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
श्रीसमर्थ रामदासस्वामी लिखित चैतन्यमय 'सुखकर्ता दुःखहर्ता' आरती म्हणताना प्रत्येक ओळ आर्ततेने म्हणावी. दिवसभरातील प्रत्येक कृती करताना 'श्री गणेशाय नमः' हा नामजप अधिकाधिक करावा. नामजपामुळे मनातील अनावश्यक विचार कमी होऊन, दिवसभर उत्साह आणि आनंद अनुभवता येतो.
मनुष्य उत्सवप्रिय आहे. पण काही मंदिरामध्ये श्री गणेश जयंतीला फुग्याची आरास, केक कापून प्रसाद वितरण, गणेश जयंतीच्या मिरवणुकीत डिजे असे प्रकार दिसतात. यामुळे सात्विकता व चैतन्य कमी होऊन रज-तमाचे प्रमाण वाढते.
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
देवतांचे विडंबन होते. मंदिरे ही चैतन्याची केंद्रे असल्याने तेथील वातावरण सात्विकच असायला हवे. शास्त्र समजून घेऊन, भक्तिभावाने केलेल्या पूजनात नक्कीच आनंद अनुभवता येतो आणि ईश्वराची कृपा संपादन करण्यास मदत होते. यंदाची गणेश जयंती भक्तिसागरात साजरी करूया.