गोव्यात सिंधुदुर्गवासियांचा परवड, एसटीचा संप मिटल्याशिवाय बससेवा सुरू न करण्याबाबत 'कदंब' ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 01:14 PM2017-10-20T13:14:33+5:302017-10-20T13:16:27+5:30

एसटी कर्मचारी संप मिटत नाही तोपर्यंत गोव्यातून कदंब बसेस महाराष्ट्रात न पाठवण्याचा निर्णय गोव्याच्या कदंब वाहतूक महामंडळाने घेतला आहे.

'Kadamb' is about to not start the bus service without ending the settlement of Sindhudurgwadi in Goa | गोव्यात सिंधुदुर्गवासियांचा परवड, एसटीचा संप मिटल्याशिवाय बससेवा सुरू न करण्याबाबत 'कदंब' ठाम

गोव्यात सिंधुदुर्गवासियांचा परवड, एसटीचा संप मिटल्याशिवाय बससेवा सुरू न करण्याबाबत 'कदंब' ठाम

Next

पणजी : एसटी कर्मचारी संप मिटत नाही तोपर्यंत गोव्यातून कदंब बसेस महाराष्ट्रात न पाठवण्याचा निर्णय गोव्याच्या कदंब वाहतूक महामंडळाने घेतला आहे. शुक्रवारी (20 ऑक्टोबर) चौथ्या दिवशीही महाराष्ट्रात जाणा-या आंतरराज्य मार्गावरील सर्व बसगाड्या रद्द करण्यात आल्या. दुसरीकडे बसगाड्या बंद असल्याने शेजारी सिंधुदुर्गातून नोकरी-धंद्यानिमित्त तसेच वैद्यकीय उपचारानिमित्त गोव्यात ये-जा करणा-यांची मोठी गैरसोय झाली आहे.

शेजारी सिंधुदुर्गातील सावंतवाडी, वेंगुर्ले आदी भागातून करासवाडा, म्हापसा औद्योगिक वसाहतीत तसेच पणजी तसेच वास्कोतील मुरगांव पोर्ट ट्रस्ट, गोवा शिपयार्डमध्ये नोकरीनिमित्त रोज ये-जा करणारे अनेकजण आहेत. काही तरुण कळंगुट, बागा तसेच दक्षिण गोव्यातील बड्या हॉटेलांमध्येही कामाला आहेत तेही ये-जा करीत असतात. मागणी तसा पुरवठा या न्यायाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सावंतवाडी, वेंगुर्ले भागातून बस फे-यांमध्ये अलीकडे वाढ केली होती त्यामुळे रोज सकाळी कामावर येऊन सायंकाळी घरी परतणा-या सिंधुदुर्गवासीयांची संख्या मोठी आहे. वेंगुर्ले आगाराने काही दिवसांपूर्वी वेंगुर्ले-म्हापसा अशी खास एसटी सुरु केली जी सायंकाळी ५.३0 वाजता म्हापशाहून सुटते.

ही बस करासवाडा औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणा-या सातार्डा, शिरोडा, वेंगुर्ले भागातील कामगारांना सोयीची ठरली होती. परंतु गेले चार दिवस एसटी संपामुळे या कामगारांना कामावर येता आलेले नाही त्यामुळे त्यांची गैरहजेरी लागली आहे. गोमेकॉत वैद्यकीय उपचार घेण्यासाठी येणाºया सिंधुदुर्गवासीयांचीही परवड झालेली आहे. सीटी स्कॅन, एमआरआय यासारख्या चाचण्या तसेच शस्रक्रियांसाठी रुग्णांना तारखा दिल्या जातात. एसटी बंद आणि कदंब बसगाड्यांचीही सोय नाही त्यामुळे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी येणाºयांचीही परवड झालेली आहे.

कदंब महामंडळाचे वाहतूक सरव्यवस्थापक संजय घाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात जाणाºया आंतरराज्य मार्गावरील कदंबच्या बसगाड्या पत्रादेवी, सातार्डा हद्दीपर्यंतच जाऊन परत येतात. रोज अडीच लाख रुपये याप्रमाणे गेल्या चार दिवसात कदंबचा १0 लाख रुपयांचा महसूल बुडाला असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, रात्रीच्यावेळी मुंबई, पुणे, शिर्डीकडे जाणा-या कदंबच्या बसगाड्या चालू आहेत. या बसेस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानकांवर जात नाहीत. त्या खाजगी बसेसप्रमाणे स्थानका बाहेरुन किंवा शहरात प्रवेश न करता बगल रस्त्याने जात आहेत.

 

Web Title: 'Kadamb' is about to not start the bus service without ending the settlement of Sindhudurgwadi in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.