नोकरीकांड : पूजा नाईकची चार तास चौकशी; वरिष्ठ अधिकारी धास्तावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 08:43 IST2025-11-10T08:42:30+5:302025-11-10T08:43:09+5:30
आयएएस अधिकारी, अभियंत्यांना नोकऱ्यांसाठी १७ कोटी रुपये दिल्याच्या आरोपांची पडताळणी

नोकरीकांड : पूजा नाईकची चार तास चौकशी; वरिष्ठ अधिकारी धास्तावले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कथित नोकऱ्या विक्री घोटाळा, प्रकरणात प्रमुख संशयित पूजा नाईक हिने स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना केलेल्या आरोपांनंतर गुन्हा शाखेकडून तिची चार तास चौकशी करत तिचा जबाब नोंदवून घेण्यात आला. २०१९ ते २०२१ या काळात नोकऱ्यांसाठी एक मंत्री, आयएएस अधिकारी, पीडब्ल्यूडी अभियंत्याला १७ कोटी रुपये दिल्याचे वक्तव्य केल्यानंतर काल, रविवारी दुसऱ्याच दिवशी तिची चौकशी करण्यात आली.
वास्तविक कथित नोकरी विक्री घोटाळा प्रकरणातील तपास हा जुने गोवे पोलिस, डिचोली, म्हार्दोळ, फोंडा आणि पणजी पोलिसांकडे आहे. गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आलेला नाही. असे असतानाही तिची जबानी ही गुन्हे शाखेकडून का नोंदवून घेतली याचा उलगडाही झालेला नाही. कथित नोकऱ्या विक्री प्रकरणफेम पूजा नाईकने १७कोटींची उलाढाल झाल्याची कथा सांगितली आहे.
एक मंत्री, एक आयएएस अधिकारी आणि अभियंत्याने मिळून तिच्याकडून ६०० उमेदवारांकडील १७कोटी रुपये घेतल्याचे सांगितले आहे. हे पैसे २४ तासांत आणून न दिल्यास त्यांची नाते उघड करण्याचा इशाराही तिने दिला. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले तेव्हा त्यांनी पूजा हिने जाहीर वक्तव्य करण्याऐवजी पोलिसांत जाऊन जबाब नोंदवावा. तसेच तिची तयारी असल्यास प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यापुढे जबानी नोंदवावी, असेही म्हटले आहे. तसे पोलिसांना निर्देश देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्याचा हा सर्वांत धाडसी निर्णय असून पूजाने दिलेल्या जबानीवर तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे.
काय आहे जबानीचे महत्त्व?
न्यायदंडाधिकाऱ्यांसमोरील जबानीला कायद्याने फार महत्त्व आहे. या कलमांतर्गत नोंदविलेले वक्तव्य हे अधिकृत नोंद म्हणून गणले जाते आणि पुढील न्यायप्रक्रियेत त्याचा उपयोग पुरावा म्हणून केला जाऊ शकतो. पारदर्शकतेसाठी वक्तव्याचा ऑडिओ किंवा व्हिडिओ नोंद ठेवणे बंधनकारक केले गेले आहे. त्यामुळे नंतर यात कोणताही फेरफार करणे किंवा दबाव टाकल्याचे वगैरे दावे कुचकामी ठरतात.
दोनच दिवसांपूर्वी, शुक्रवारी पूजा नाईक हिने सरकारी नोकरी घोटाळ्यात मंत्री, आयएएस अधिकारी, पीडब्ल्यूडीच्या अभियंत्याचा सहभाग असल्याचे एका स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले होते. यासाठी आपण संबंधितांना सुमारे १७ कोटी रुपये दिल्याचा आरोप पूजा हिने केला होता.
पूजा नाईकने २४ तासांच्या आत रक्कम परत न केल्यास संबंधितांची नावे उघड करण्याची धमकीही दिली होती. नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सुमारे ६०० हून अधिक जणांकडून पैसे घेतले आणि या इच्छुक उमेदवारांच्यावतीने हे पैसे आयएएस अधिकारी, पीडब्ल्यूडी अभियंत्यांना दिले, असे तिने सांगितले. संबंधितांना पर्वरीतील कार्यालयात तसेच सचिवालयातही पैसे देण्यात आल्याचा आरोप तिने केला. याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेटणार असल्याचेही पूजाने सांगितले होते.
अनेकांचे टेन्शन वाढले
काही महिन्यांपूर्वी सरकारला बॅकफूटवर जाण्यास भाग पाडलेले पूजा नाईक प्रकरण जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गाजू लागले आहे. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांनी एकदम कडक भूमिका घेतली. त्यानंतर गतीने हालचाली झाल्या. आता पूजा हि जबाबामुळे कोणाचा 'गेम' होणार याचीच उत्कंठा गोमंतकीयांना लागली आहे.
आज मॅजिस्ट्रेटपुढे हजर करणार?
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूजा नाईकची तयारी असल्यास तिला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जबानी नोंदविण्यास नेण्यासंबंधीही पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यामुळे सोमवारी तिला जबानीसाठी नेले जाण्याची शक्यता आहे.
एखाद्या संशयिताला किंवा साक्षीदाराला जबानी नोंदविण्यास असुरक्षितता वाटत असेल तर ती व्यक्ती जबानी पूर्वी फौजदारी दंड संहिता १६४ अंतर्गत आणि आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १८३ अंतर्गत प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायाधीशासमोर नोंदवू शकते. या जबानीवेळी न्यायदंडाधिकारी, संशयित व्यक्ती, तपास अधिकारी आणि संशयिताचा वकील अशा चारच व्यक्ती उपस्थित असतात.
कोणाचीही गय करणार नाही
रविवारी पेडणे येथे पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पूजा हिला कुणाची नावे घ्यायची असतील तर तिने माझ्याकडे घेण्याची गरज नाही. त्याऐवजी तिने तपास यंत्रणेकडे जावे. जे अधिकारी तपास करीत आहेत, त्यांच्याकडे सविस्तरपणे माहिती द्यावी. जर त्यात तथ्य आढळले तर सरकार संबंधितांवर कडक कारवाई करेल. त्यात कोणी मंत्री असला तरी गय केली जाणार नाही. पूजाकडून जी नावे घेतली जातील, त्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल. पूजाला नावे माहीत असतील किंवा एखाद्या मंत्र्याचेही नावही त्यात असेल तर तिने जे पोलिस अधिकारी तपास करतात, त्यांच्याकडे नावे द्यावीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
पूजाने जरूर पुरावे सादर करावेत : तानावडे
नोकरी घोटाळ्याविषयी पूजा नाईकने जे आरोप केले आहेत आणि तिच्याकडे काही पुरावे असतील तर तिने ते जरूर सादर करावेत अशी प्रतिक्रिया खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली. तानावडे म्हणाले की, 'पूजा नाईकच्या वक्तव्यासंदर्भात योग्य चौकशी करून जर पुरावा मिळाला तर सरकार जरूर कारवाई करेल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी काल मांडली आहे. सरकार याबाबत अतिशय पारदर्शक असून पूजा नाईकने जरूर असलेले पुरावे सादर करावेत. सरकार योग्य ती कारवाई करेल याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एखाद्या बाबतीत जर गैरव्यवहार झाले असतील व त्यासंदर्भात पुरावे सादर करून त्याची शहानिशा झाली तर निश्चितपणे राज्य सरकार त्याची योग्य दखल घेण्यास सक्षम आहे.'