'ओंकार'ला पकडण्यासाठी लागणार तब्बल सहा हत्ती: विश्वजीत राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:39 IST2025-09-24T12:39:14+5:302025-09-24T12:39:56+5:30
कर्नाटक व महाराष्ट्र प्रशासनासह वन अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू

'ओंकार'ला पकडण्यासाठी लागणार तब्बल सहा हत्ती: विश्वजीत राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : एका ओंकार हत्तीला पकडण्यासाठी सहा हत्ती तसेच तज्ज्ञांचे पथक लागते. ही प्रक्रिया संवेदनशीलपणे हाताळणे आवश्यक आहे. गोव्यात तशी यंत्रणा नसल्याने आम्ही कर्नाटक सरकारकडे ही यंत्रणा देण्यासाठी चर्चा केल्याचे वन मंत्री विश्वजीत राणे यांनी काल सांगितले.
ओंकार हा हत्ती महाराष्ट्रातून गोव्यात दाखल झाला आहे. हत्तींना पकडण्यासाठी जी काही यंत्रणा, तज्ज्ञ आवश्यक आहेत ते गोव्यात नाहीत. त्यामुळे आम्ही कर्नाटक सरकारची मदत घेणार आहोत. महाराष्ट्राने सुध्दा हत्तींचा विषय कर्नाटक सरकारकडे मांडला होता. मात्र आता तेथील हत्ती गोव्याच्या हद्दीत आल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री राणे म्हणाले, ओंकार हत्तीला पकडण्यासाठी गोव्याला पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले आहे. त्यांचे वन मंत्री, वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांचे पथक गोवा वन खात्याच्या पथकांशी समन्वय साधून काम करेल.
यासंबंधी त्यांच्याशी पाठपुरावाही केला जात आहे. कर्नाटक येथे तीन ते चार ठिकाणी हत्तींची समस्या आहे. कर्नाटक येथील हत्ती सध्या दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी तैनात आहेत. एक हत्ती पकडण्यासाठी सहा हत्तींची गरज भासत असल्याचे त्यांनी सांगितले.
'वनतारा'चा प्रस्ताव नाही
ओंकारला पकडल्यानंतर त्याचे पुनर्वसन कुठे करायचे? यावर निर्णय झालेला नाही. मात्र गोवा सरकारकडे अद्याप तरी त्याच्या पुनर्वसनाबाबत 'वनतारा'कडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. ओंकारकडून सध्या पेडणे येथील तांबोसे गावातील बागायती, शेतांचे नुकसान केले जात आहे. तेथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा विषय हा कृषी खात्याच्या अख्यारित्यात येतो, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.