लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : बिट्स पिलानी कॅम्पसमधील मृत विद्यार्थ्याच्या शवविच्छेदन अहवालात आत्महत्या नसून आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे, असे डॉ. मधू घोडकिरेकर यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांनी आत्महत्या म्हणून केलेला दावा चुकीचा असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. घोडकिरेकर म्हणाले की, ज्या विद्यार्थ्याने अँटी डिप्रेशन औषध घेतले होते. त्यानंतर त्याला झोपेत उलट्या झाल्या आणि तिच उलटी श्वासनलिकेत अडकून गुदमरून त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. बहुतेक माध्यमांनी ही आत्महत्या असल्याचे वृत्त प्रसारीत केले, परंतु प्रत्यक्षात हा मृत्यू अपघाती होता. तो मुलगा अँटी डिप्रेशन औषध घेत होता आणि त्याला बरे व्हायचे होते. परंतु दुर्दैवाने माध्यमांनी या घटनेला आत्महत्येचा दृष्टिकोन दिला आणि ही खळबळजनक बातमी बनवली जे खूप चुकीची आहे.
अनेक उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची योग्य मानसिक काळजी आणि लक्ष देण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळून आले आहे. गेल्या एका वर्षात बिट्स पिलानी येथील विद्यार्थ्यांच्या पाच मृत्यूंपैकी दोन आत्महत्या म्हणून पुष्टी झाल्या आहेत. परंतु इतर तीन मृत्यू प्रकरणे आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने ओढवल्याचे दिसून आले आहे.
डॉ. घोडकीरेकर यांनी पुढे सांगितले की, असेही निदर्शनास आले आहे की हे विद्यार्थी त्यांचे नियमित जेवण वगळतात आणि मल्टीविटामिन आणि आरोग्य पूरक आहार, प्रथिने पावडरचे उच्च डोस घेतात जे दीर्घकालीन हानिकारक असतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण न घेता एकाग्रतेने लक्ष द्यावे. अमलीपदार्थांपासून दूर राहावे. इतर कुणी करीत असेल, तर परावृत्त करावे.