दूध उत्पादकांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 07:27 IST2025-10-10T07:26:08+5:302025-10-10T07:27:16+5:30
खात्याला सूचना : भारतीय किसान संघ, दूध उत्पादक संघटनेने घेतली भेट

दूध उत्पादकांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दूध उत्पादक तसेच शेतकऱ्यांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन विविध मागण्या त्यांच्याकडे मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी मागण्या तत्त्वतः मान्य करून त्वरित अंमलबजावणी करण्याची सूचना पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक व अन्य अधिकाऱ्यांना केल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.
भारतीय किसान संघ आणि दूध उत्पादक उत्कर्ष संघटना यांच्या कार्यकर्त्यानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिष्टमंडळात
भारतीय किसान संघाचे अध्यक्ष संजीव कुंकळयेकर, श्रीरंग जांभळे, पांडुरंग पाटील, कृष्णनाथ देसाई व दूध उत्पादकांच्या संघटनेचे शिवानंद बाक्रे व इतर उपस्थित होते.
प्रमुख मागण्या...
गेले दीड वर्ष प्रलंबित असलेली कामधेनू योजनेतील त्रुटी दूर करून नव्याने सुरू करावी, गायींच्या खरेदी किमतीत भरीव वाढ करावी, दुधाची आधारभूत किंमत दर महिन्याला नियमितपणे द्यावी, वासरांच्या संगोपनासाठी असलेली मदत दर महिन्याला वेळेवर द्यावी, औषधांचा तसेच मिनरल मिक्स्चर यांचा
पुरवठा मुबलक आणि खंड न पडता करावा, लसीकरण वेळोवेळी करावे, शेती उत्पादनासंबंधित आधारभूत किमती लवकर मिळावा, शेती अवजारांच्या खरेदी बाबतीत मिळणाऱ्या सबसिडी लवकर दिल्या जाव्यात, सुपारीवर फवारणीसाठी मिळणाऱ्या सबसिडी बाजार किमतीच्या प्रमाणे वाढवाव्यात, जंगली जनावरांच्या उपद्रवांमुळे होणारी नुकसान भरपाई लवकर मिळावी व सेंद्रिय शेतीसाठी असलेल्या सुविधा व सवलती मिळाव्यात या प्रमुख मागण्या होत्या व मुख्यमंत्र्यांनी त्या मान्य केल्या असल्याचे सांगण्यात आले.