नगरपालिकांत सौर ऊर्जा प्रकल्प साकारा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 07:39 IST2025-10-11T07:38:17+5:302025-10-11T07:39:09+5:30
साखळी नगरपालिकेतर्फे साकारलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

नगरपालिकांत सौर ऊर्जा प्रकल्प साकारा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: सौर ऊर्जा प्रकल्पामुळे साखळी नगरपालिकेला मोफत वीज मिळणारच आहे. पण या प्रकल्पातून तयार होणारी अतिरिक्त वीज ही ग्रीडला पुरवल्यानंतर त्याचे नगरपालिकेला वेगळे पैसे मिळणार आहेत. साखळी नगरपालिकेकडून प्रेरणा घेत अशा प्रकारचे सौर ऊर्जा प्रकल्प राज्यातील इतर नगरपालिका व पंचायतींनीही साकारावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी नगरपालिकेतर्फे नगरपालिका इमारतीच्या छतावर साकारलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साखळीच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, नगरसेवक आनंद काणेकर, ब्रह्मानंद देसाई, यशवंत माडकर, रियाज खान, निकिता नाईक, दीपा जल्मी, अंजना कामत, विनंती पार्सेकर, मुख्याधिकारी श्रीपाद माजिक, अभियंता जयेश कळंगुटकर, सुभाष म्हाळशेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील सर्व नगरपालिका व पंचायती स्वयंपूर्ण व्हाव्यात, वीज व पाणी यावरील खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर करावा, या आवाहनाला साखळी नगरपालिकेने साथ देत सौर ऊर्जा प्रकल्प साकारला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रदूषणमुक्तीचा नारा
नैसर्गिक संसाधनांचा वापर करून प्रदूषणमुक्तीचा नारा केंद्र व राज्य सरकारनेही दिला आहे. २०५० शून्य टक्के कार्बन इमल्शन करण्यात सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यासाठी सरकारी कार्यालये व रहिवासी घरांवरही साकारणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
५० हजार रुपयांची होणार बचत : सिद्धी प्रभू
साखळी नगरपालिका स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल टाकत असून, पाणी व वीज या दोन्ही बाबतीत पालिका खर्चात कपात करण्यात यशस्वी होणार आहे. सध्या साखळी बाजारातील दोन विहिरींना पुनर्जीवित करून त्यांचे पाणी बाजार प्रकल्प व नगरपालिकेला दिले जाते. त्यामुळे सुमारे ५० ते ६० हजार रुपयांची बचत होत आहे. आता सौर ऊर्जा प्रकल्पातून सुमारे ५० हजार रुपयांची बचत होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्णत्वास आणण्यास मदत झाली, असे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांनी सांगितले. तसेच नगराध्यक्ष प्रभू म्हणाल्या की, साखळी नगरपालिकेतर्फे नगरपालिका इमारतीच्या छतावर साकारलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पालिका आता स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर असून सर्व नगरसेवक, कर्मचारी वर्गाचा यात महत्त्वाचा वाटा असल्याचेही नगराध्यक्ष प्रभू म्हणाल्या.