'माझे घर' प्रभावीपणे राबवा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:32 IST2025-10-09T09:31:24+5:302025-10-09T09:32:46+5:30
उपजिल्हाधिकारी, मामलेदारांना मार्गदर्शन

'माझे घर' प्रभावीपणे राबवा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'माझे घर' योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व्यांनी बुधवारी महसूल विभागाचे अधिकारी, तसेच वेगवेगळ्या तालुक्यांचे मामलेदार, उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. येत्या सोमवारपर्यंत योजनेचे अर्ज लोकांना उपलब्ध होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, खात्याचे सचिव बैठकीला उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ४ रोजी या योजनेचा प्रारंभ केलेला आहे.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'अधिकाऱ्यांना पूर्णपणे योजना समजावून सांगण्यात आली आहे. त्यांना पुस्तिकाही प्रदान करण्यात आली आहे. ही पुस्तिका म्हणजे 'माझे घर' योजनेसाठी 'गीता'च आहे. अकरा वेगवेगळ्या पद्धतीने अनधिकृत बांधकामे नियमित केली जातील. पाच मुख्य योजना आहेत, त्या प्राधान्याने राबविल्या जातील. प्रत्येकाला योजनेचा लाभ होईल हे पाहिले जाईल.'
डाकसेवक भरतीसाठी कोंकणीचे ज्ञान अनिवार्य
टपाल खात्याच्या वतीने गोव्यात भरण्यात येणाऱ्या डाकसेवक पदांसाठी उमेदवाराने दहावीपर्यंत कोंकणी किंवा मराठी विषय घेतलेला असणे आवश्यक असून, मराठी शिकलेल्यांना कोंकणी भाषेचे ज्ञान सक्तीचे केले आहे. कोकणी ज्ञानाविषयी गोवा कोंकणी अकादमीचे किंवा अन्य मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. अर्जदारांसाठी यापुढे कोंकणी भाषेतील प्रवीणता अनिवार्य असेल. भरतीसाठी स्थानिक भाषा म्हणून कोंकणी आणि मराठीला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. दहावीपर्यंत कोंकणी किंवा मराठी भाषेत शिक्षण घेतलेले उमेदवार पात्र असतील.
तथापि, मराठीमध्ये प्रवीण असलेल्यांना कोंकणी भाषेचे ज्ञान असलेले प्रमाणपत्र दाखवावे लागेल. भरती नियमातील या महत्त्वाच्या दुरुस्तीमुळे गोमंतकीयांना भरतीमध्ये प्राधान्य मिळेल, स्थानिक तरुणांसाठी अधिक रोजगार संधी निर्माण होतील आणि गोव्यात टपाल सेवा वितरण बळकट होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. त्यातून अधिकाधिक गोमंतकीय तरुणांना संधी मिळेल असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी टपाल खात्याच्या गोवा विभागाचे संचालक रमेश पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा केली. टपाल विभागाने ग्रामीण डाकसेवक भरतीच्या अटींत केलेल्या सुधारणांबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. गोव्यातील टपाल विभाग महाराष्ट्र सर्कलमध्ये येतो. अनेकदा पोस्टमन किंवा डाकसेवक भरताना महाराष्ट्रातील उमेदवारांची भरती केली जात असे. याबद्दल विरोधी पक्षांनीही आवाज उठवला होता.
हा गोमंतकीयांचा विजय : सरदेसाई
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी या निर्णयाचे स्वागत करताना हा गोमंतकीयांचा विजय असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, टपाल खात्यातील पदे भरताना कोंकणीचे ज्ञान सक्तीचे करा, अशी मागणी मी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. केंद्राने अखेर ही मागणी मान्य केली. भाषा ही आमची ओळख आहे. या निर्णयामुळे हक्काच्या नोकऱ्या गोमंतकीयांकडेच राहतील. अलीकडेच टपाल खात्यात काही पोस्टमन भरले. ते महाराष्ट्रातील असून, त्यांना नीट पत्तेही ठाऊक नसल्याने लोकांना पत्रे मिळत नाहीत, ती कचरापेटीत टाकली जातात अशा तक्रारी आहेत. या पोस्टमनना काढून टाकावे व गोवेकरांना या पदांवर संधी दिली जावी.