IFFI 2019 to begin tomorrow in Goa | गोव्यात इफ्फीचा माहोल, उद्यापासून सोहळ्यास आरंभ
गोव्यात इफ्फीचा माहोल, उद्यापासून सोहळ्यास आरंभ

ठळक मुद्देगोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) शानदार माहोल निर्माण होऊ लागला आहे.यंदाचा इफ्फी हा सुवर्ण महोत्सवी असल्याने राजधानी पणजीत इफ्फीचा आनंद ओसंडून वाहू लागला आहे.एकूण 76 देशांमधील दोनशे चित्रपट यावेळच्या इफ्फीत प्रदर्शित केले जाणार आहेत.

पणजी - गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) शानदार माहोल निर्माण होऊ लागला आहे. यंदाचा इफ्फी हा सुवर्ण महोत्सवी असल्याने राजधानी पणजीत इफ्फीचा आनंद ओसंडून वाहू लागला आहे. बुधवार (19 नोव्हेंबर) पासून इफ्फीला आरंभ होत आहे.

चित्रपट महोत्सव संचालनालय गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने गेल्या पंधरा वर्षापासून गोव्यात इफ्फीचे आयोजन करत आहे. एकूण 76 देशांमधील दोनशे चित्रपट यावेळच्या इफ्फीत प्रदर्शित केले जाणार आहेत. त्यापैकी 24 चित्रपट हे ऑस्कर नामांकनाच्या स्पर्धेतील आहेत. पन्नास महिला दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले पन्नास चित्रपट इफ्फीत दाखविले जातील. याशिवाय स्वर्गीय गिरीश कर्नाड, मृणाल सेन, कादर खान आदी दिवंगत सिनेकलाकारांच्या योगदानाचे इफ्फीत विशेष स्मरण केले जाणार आहे. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात इफ्फीची संस्कृती रुजावी म्हणून दिलेल्या  योगदानावर प्रकाश टाकणारा माहितीपट इफ्फीत दाखविला जाणार आहे.

गोव्यात पन्नासाव्या इफ्फीनिमित्ताने वातावरणाची निर्मिती झालेली आहे. देश- विदेशातील शेकडो प्रतिनिधी इफ्फीत सहभागी होण्यासाठी राजधानी पणजीत मंगळवारी दाखल झाले आहेत. अजून बरेच प्रतिनिधी उद्या बुधवारी व परवा गुरुवारी दाखल होतील. 28 नोव्हेंबर पर्यंत इफ्फी सुरू राहील. इफ्फीचा उद्घाटन व समारोप सोहळा पणजीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात होणार आहे. उद्घाटन बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते केले जाणार आहे. रजनीकांतला विशेष पुरस्कार देऊन इफ्फीत गौरविले जाणार आहे. उद्घाटन सोहळ्य़ाला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर हेही उपस्थित राहणार आहेत.

इफ्फीसाठी यंदा नऊ हजारपेक्षा जास्त प्रतिनिधींची नोंदणी झालेली आहे. प्रतिनिधींना कार्डाचे वितरण करण्याची प्रक्रिया पणजीत सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इफ्फीनिमित्तच्या तयारीवर लक्ष ठेवले आहे. मांडवी किनारी वसलेल्या पणजी शहरात मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पूर्णपणे रोषणाई करण्यात आली आहे. हिरव्या झाडांवरील नक्षीदार रोषणाई रात्रीच्यावेळी पणजीच्या  सौंदर्यात आणखी भर टाकत आहे. सिंगापुरमधील एखाद्या शहरासारखी रात्रीच्यावेळी पणजी दिसून येते.

 

Web Title: IFFI 2019 to begin tomorrow in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.