हिंमत असेल तर मला अटक करूनच दाखवा!; आमदार वेंझी व्हिएगश यांचे सरकारला थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:47 IST2025-09-25T12:47:16+5:302025-09-25T12:47:42+5:30
माझ्याविरुद्ध खोटी तक्रार

हिंमत असेल तर मला अटक करूनच दाखवा!; आमदार वेंझी व्हिएगश यांचे सरकारला थेट आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारमध्ये मला हात लावण्याची हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करून दाखवावीच, असे थेट आव्हान आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगश यांनी दिले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, भाजप कार्यालयात घुसल्याची किंवा अतिक्रमण केल्याची माझ्या विरुद्धची तक्रार खोटी आहे. हे सर्व फ्रॉड आहे. मी भाजप कार्यालयात घुसलो नाही. त्यामुळे एफआयआर आणि अटकेचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपने दाखल केलेली तक्रार खोटी आहे. या सरकारला मला हात लावण्याची हिंमत नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, गोव्यातील लोकांना आधीच माहीत आहे की, काणकोणकर हल्ला प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे. मात्र, सरकार ते मान्य करण्यास तयार नाही. या प्रकरणात योग्य तपास करण्यात आलेला नाही व खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी दिशाभूल करण्याचे डावपेच आखले जात आहेत, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून समाचार
रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाशी एका कॅबिनेट मंत्र्याचा संबंध असल्याच्या विरोधी आमदारांनी केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, काहीजणांना उगाचच राजकारण करण्याची सवय आहे. काणकोणकर हल्ला प्रकरणात पोलिस सखोल चौकशी करीत आहेत. माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. आमदार वेंझी व्हिएगश व आमदार कार्ल्स फेरेरा यांनी काणकोणकर हल्ला प्रकरणात काही गंभीर आरोप केले होते. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या कुख्यात गुंड जेनिटो कार्दोज याच्यासह आठ जणांना पणजी प्रथमवर्ग न्यायालयाने आज दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रामावर उपचार सुरूच...
प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवाचे हृदयनाथ शिरोडकर, महेश म्हांब्रे व इतरांनी बुधवारी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात जाऊन रामा काणकोणकर यांची भेट घेतली व विचारपूस केली. रामाला हल्ल्यामुळे मोठा मानसिक व भावनिक धक्का बसलेला आहे.