योग्य वेळ आली की भाष्य करेन : आमदार गोविंद गावडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 07:42 IST2025-12-31T07:41:59+5:302025-12-31T07:42:34+5:30
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा करत आहे.

योग्य वेळ आली की भाष्य करेन : आमदार गोविंद गावडे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बेतकी-खांडोळ मतदारसंघातून निवडून आलेल्या जिल्हा पंचायत सदस्याने भाजपला पाठिंबा दिला आणि भाजपने तो स्वीकारला आहे, पण हे करताना मला कोणीच विश्वासात घेतलेले नाही. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी चर्चा सुरू आहे. अद्याप यावर मी काहीच बोलणार नाही, योग्य वेळ आली की मी पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य करेन, असे आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, की याबाबत मी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा करत आहे. मी यापूर्वी एकदा यांच्याशी चर्चा देखील केली होती, पण तेथे ठोस काही सांगितले नाही. पुन्हा आपण यावर विशेष चर्चा करू असे म्हणून हा विषय टाळला. यानंतर मी पुन्हा त्यांच्याकडे वेळ मागितली आहे. ते मध्यंतरी व्यस्त होते. कदाचित ते मला नंतर वेळ देतील.
विषय लोकांसमोर मांडणार
मी आता केवळ मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या स्पष्टीकरणावर अवलंबून आहे. त्यांच्याकडून मला याबाबतचे स्पष्टीकरण मिळाले की मी माझ्या लोकांना व माझ्या कार्यकर्त्यांना नेमके काय झाले ते सांगणार आहे, असेही गावडे यांनी सांगितले.