सहा महिन्यांत घराची सनद: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 07:42 IST2025-10-16T07:41:49+5:302025-10-16T07:42:28+5:30
सांगेत 'माझे घर' योजनेच्या अर्जाचे वितरण

सहा महिन्यांत घराची सनद: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे : माणूस आपल्या आयुष्यात एकदाच घर बांधतो आणि ते त्याच्या पुढील पिढीला मिळावे हीच त्याची इच्छा असते. गोव्यातील नागरिकांची सरकारी आणि कोमुनिदाद जागेतील अनधिकृत घरे कायदेशीर करावीत, यासाठी माझ्या सरकारने पुढाकार घेऊन 'माझे घर' योजना तयार केली. या योजनेचे आता अर्ज वितरण करण्यात येत आहे. येत्या सहा महिन्यांत आम्ही घरे कायदेशीर करण्यासाठी लागणारी घराची सनद घेऊन तुमच्यासमोर येऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
सांगे मतदारसंघातील नागरिकांना 'माझे घर' योजनेचे अर्ज वितरित करण्यासाठी सांगे नगरपालिका सभागृहात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई, नगराध्यक्ष संतीक्षा गडकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एगना क्लिटस, उपजिल्हाधिकारी मिलिंद वेळीप, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, मामलेदार सिद्धार्थ प्रभू, गट विकास अधिकारी पारितोष फळदेसाई, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, नगरसेवक आदी हजर होते.
आपले सरकार हे संवेदनशील असून माझे घर योजने अंतर्गत सरकारी, भाटकार, सोशियेदाद, आल्वारा, कोमूनिदाद, साळावली धरणग्रस्तांना पुनर्वसन केलेल्या जमिनीतील घरे आता कायदेशीर होणार आहेत. सामान्य गोवेकरांचे हित डोळ्यासमोर घरे कायदेशीर करण्यासाठी ठेऊन कायद्यात बदल केला. या निर्णयाचा शेतकरी, कष्टकरी आणि सर्व धर्माच्या लोकांना फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विरोधकांनी विधानसभेत या कायद्याला विरोध केला. त्यांना लोकांचे काहीच पडलेले नाही. विरोधक जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. विरोध करणारे बंगल्यात राहतात. तुम्ही भाजप सरकार, माझ्यावर आणि मंत्री सुभाष फळदेसाईवर विश्वास ठेवा असेही सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी केंद्रीय 'माझे घर' योजनेचे उद्घाटन करण्यात आले. आता संपूर्ण गोव्यात या योजनेच्या अर्जाचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. २०१४ पूर्वीची गोव्यातील घरे अनधिकृत आहेत ती कायदेशीर व्हावी, यासाठी 'माझे घर' योजना आणली, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.
माझे घर मोठी भेट
या योजनेमुळे अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात आपल्या घराबाबतचे भय दूर होणार आहे. आपले घर आपल्या नावावर व्हावे, असे लोकांचे स्वप्न आता आमचे सरकार पूर्ण करत आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी 'माझे घर' योजनेद्वारे संपूर्ण गोमंतकीयांना मोठी भेट दिल्याचे फळदेसाई म्हणाले. सूत्रसंचालन रणजित चिपळूणकर यांनी केले तर मिलिंद वेळीप यांनी आभार मानले.