अरे आधी माझे भाषण ऐका, मग जेवायला जा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 09:44 IST2025-12-28T09:43:54+5:302025-12-28T09:44:08+5:30
एका सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच लोकांनी जेवणासाठी गर्दी केली. हा प्रकार पाहताच 'अरे माझे भाषण झालेले नाही, जेवण बंद करा' असे जाहीरपणे सांगण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली.

अरे आधी माझे भाषण ऐका, मग जेवायला जा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा व्हिडिओ व्हायरल
पणजी : हल्ली राजकीय सभांना गर्दी होते. याची केवळ दोन कारणे असतात. एक म्हणजे सभा घेणारा नेता लोकांचा लाडका असतो आणि दुसरे म्हणजे खाण्या-पिण्याची चांगली सोय. पण बहुतांश लोक हे दुसऱ्या कारणासाठी येत असतात, हे नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमादरम्यान लोकांनीच सिद्ध केले.
जिल्हा पंचायत निवडणुकीत विजय प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नावेलीतील एका जाहीर सभेत उपस्थिती लावली. पण मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच लोकांनी जेवणासाठी गर्दी केली. भाषण देण्यासाठी उभे असलेल्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकार पाहिला आणि, 'अरे माझे भाषण झालेले नाही, जेवण बंद करा' असे जाहीरपणे सांगण्याची वेळ आली.
यानंतर लोकांना लागलेली भूक लक्षात घेऊन १० मिनिटांतच माझे भाषण संपवतो, असे म्हणत येथील वातावरण जरा हलके फुलके केले. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर मात्र बराच व्हायरल झाला. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स देखील केल्या.