पावसाचे थैमान; राज्यातील जनजीवन विस्कळीत, ग्रामीण भागात संपर्क तुटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:22 IST2025-07-04T13:22:03+5:302025-07-04T13:22:31+5:30

ऑरेंज अलर्ट जारी; अनेक ठिकाणी पडझड; शाळा बंद, नद्यांच्या पातळीत मोठी वाढ

heavy rains normal life disrupted in the goa state communication lost in rural areas | पावसाचे थैमान; राज्यातील जनजीवन विस्कळीत, ग्रामीण भागात संपर्क तुटला 

पावसाचे थैमान; राज्यातील जनजीवन विस्कळीत, ग्रामीण भागात संपर्क तुटला 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बुधवारपासून राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला, कालही राज्यभर मुसळधार हजेरी लावली. पावसामुळे शहरांसह ग्रामीण भागातील रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घरे, विविध आस्थापनांमध्ये पाणी शिरल्याने लोकांची गैरसोय झाली. पावसाचा जोर लक्षात घेता शिक्षण खात्याने आज शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला. काल तिसवाडी, बार्देश, पेडणे, डिचोली, सत्तरी, सासष्टी, मुरगाव, सांगे, केपेसह फोंडा, धारबांदोडा तालुक्यात पावसाने मोठी पडझड झाली आहे. वीजखांबही कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान कार्यरत होते.

राज्यात गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्यापर्यतच्या २४ तासांत ६ इंचापेक्षा अधिक पाऊस पडला आहे. यामुळे मान्सूनची तूटही भरून निघाली आहे. आतापर्यंत ४१ इंचांहून अधिक हंगामी पावसांची नोंद झाली आहे. पुढील २४ तासांत जोरदार पाऊस पडण्याचा इशारा गोवा वेधशाळेने दिला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पणजीसह मेरशी, चिंबल, ताळगाव, रायबंदर, बेती, सांताक्रूझ, बांबोळी भागातील रस्ते पाण्याखाली गेले. रायबंदर येथील राम मंदिरजवळील एका घराच्या बाजूची संरक्षक भिंत कोसळल्याने घरालाच मोठा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिल्याने आज शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

पणजी शहरातील बहुतेक रस्त्यांवर काल मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. पाटो परिसराला तर नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. स्मार्ट सीटीमध्ये दयानंद बांदोडकर मार्गावर इलेक्ट्रीक वाहनांसाठी ठेवण्यात आलेले चार्जिंग पाँईट्स पाण्याखाली गेले होते. बांबोळी-गोवा विद्यापीठ रस्ताही गोमेकॉजवळ पाण्याखाली गेला होता. येथील भुयारी मार्गातही पाणी साचले होते.

बेती येथे मोठे झाड पडून वाहनाची मोडतोड झाली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत ते झाड हटवले. केपे येथे कुशावती नदीला पूर आल्यामुळे मडगाव केपे रस्ता पाण्याखाली गेला, अवेडे-केपे येथील रस्ता आणि पूलही पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक सेवा बंद ठेवावी लागली. तुये-भोमवाडा येथे वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे काहींच्या घराचे छपरे उडून गेली आहेत. आमदार जीत आरोलकर यांनी याची दखल घेत नुकसानग्रस्तांना वैयक्तिक तसेच सरकारी पातळीवरूनही मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

अग्निशामक दलाला गुरुवारी दिवसभरात राज्यातील विविध ठिकाणाहून ५८ कॉल्स आले. यातील सुमारे ५३ कॉल्स हे पडझडीच्या बाबतीत होते. २ कॉल्स हे आग लागल्याचे तर ३ इतर आपत्कालीन स्थितीतील होते. पणजीतील कॅफे सेंट्रलजवळील घरावर झाड कोसळल्याने २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच कारापूर येथील पार्क केलेल्या टँकरवर झाड पडले होते, जे दलातर्फे हटविण्यात आले.

पावसामुळे तसेच वाहणाऱ्या वादळी वाऱ्यातून बार्देश तालुक्यातील अनेक भागांत पडझडीसह पावसाचे पाणी साचून राहण्याचे प्रकार घडले आहेत. नास्नोळा, उसकई, बेती परिसरात झाडे पडली. तर गिरी येथील पंचायत कार्यालयाचा परिसर पाण्याखाली गेला होता.

पारोडा गावात शिरले पाणी

गेल्या ४८ तासांत केपे, सांगे तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पारोडा गावाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. सार्जीनी-सांगे येथे जमीन खचली, तर कुडचडे-होडारा गावात रस्ता खचल्याने मालवाहू ट्रक उलटला. पावसामुळे केपे-मडगाव मुख्य रस्ता ३६ तास वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. तसेच पारोडा पूल पाण्याखाली असून चंद्रेश्वर भूतनाथ पर्वतरोड ते कराळी-केपे हा दीड किलोमीटर रस्ता बंद ठेवल्याने लोकांची गैरसोय झाली. विरोधी पक्षनेते युरी अलेमाव व केपे आमदार अल्टन डिकॉस्टा यांनी सरकारी अधिकाऱ्यांसह पारोडाच्या पूर क्षेत्राची पाहणी केली.

१० ठिकाणी पडझड

राज्यात काल सकाळी ८.३० वाजण्यापर्यंतच्या २४ तासात ६ इंचाहून अधिक पाऊस पडला. तर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. पावसामुळे काणकोणमधील नद्या, नाले तुडुंब वाहू लागले असून सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. काणकोण तालुक्यात १० ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. आगस, सादोळशे, मुठाळ, अवे, अर्थफॉड, हत्तीपावल, मास्तीमळ, देळे, कोळंब येथे घरावर झाडे पडले.

सावरी धबधब्यावर जाणारी पायवाट खचली

सांगे आणि केपे तालुक्याला बुधवार रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसाचा परिणाम नेत्रावळी परिसरात दिसून आला. साजिनी गावातून सावरी धबधब्यावर जाणाऱ्या पायवाटेच्या पायऱ्या आणि रेलिंग परिसरात जमीन खचली.

दुचाकीस्वार जखमी

डिचोली तालुक्यात गुरुवारीही पावसाचा जोर चालूच होता. सुर्लाच्या जुन्या पंचायतीजवळ झाड कोसळून दुचाकीस्वार जखमी झाला. त्याचवेळी झाडामुळे खांबही पडला. मात्र, सुदैवाने यात दुचाकीस्वार बचावला. जखमी व्यक्तीला पाळी येथील इस्पितळात दाखल करण्यात आले. मुळगाव, आमोणा व इतर भागातही पडझड झाली असून अग्निशामक दलाच्या जवानांनी मदत कार्य सुरू ठेवले आहे. पावसामुळे वाळवंटी, डिचोली-पार नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून आपत्ती नियंत्रण लक्ष ठेवून आहे.

 

Web Title: heavy rains normal life disrupted in the goa state communication lost in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.