पावसाची जोरदार 'बॅटिंग'; सलग तिसऱ्या दिवशी झोडपले, घरे, झाडांची पडझड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:52 IST2025-08-20T12:51:53+5:302025-08-20T12:52:35+5:30
नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

पावसाची जोरदार 'बॅटिंग'; सलग तिसऱ्या दिवशी झोडपले, घरे, झाडांची पडझड
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सलग तिसऱ्या दिवशी राज्याला जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसामुळे राज्यात सर्वत्र मोठी पडझड झाल्याचेही वृत्त आहे. भारतीय हवामान खात्याने यलो अलर्ट हटवून जोरदार पावसाची सूचना देणारा ऑरेंज अलर्ट ही तातडीने जारी केला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी घरांची, झाडांची पडझड झाली. या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
मंगळवार हा मुसळधार पावसाचा दिवस ठरला. सकाळी सुरू झालेला पाऊस अधून-मधून विश्रांती घेत कोसळत राहिला. उसंत घेत पडणारा पाऊस इतका जोरदार होता की अवघ्या काही मिनिटांतच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत तीन इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतरही कोसळल्यामुळे जोरदार पाऊस बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत ही ३ इंचाहून अधिक पाऊस नोंद होण्याची शक्यता आहे. चतुर्थी पूर्वीच हंगामी मान्सून इंचाचे शतक पार करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत ९५ इंच सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
घोगळ येथे संरक्षक भिंत कोसळली
जोरदार पावसामुळे घोगळ - मडगाव येथील कुडतरकर इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र या भिंतीचा भाग जवळील स्वीमिंग पूलमध्ये पडल्यामुळे मोठी गैरसोय झाली आहे. अग्निशामक दलाचे जवान येथील अडथळे हटविण्याचे काम करीत होते.
झाडाच्या फांद्या कोसळल्या वाहनांवर
मिरामार येथे आंब्याची मोठी फांदी मोडून खाली पार्क करून ठेवलेल्या मोटारीवर पडली. दोन्ही कार गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
फॉलसिलिंग कोसळले
पेडे - म्हापसा येथील इनडोअर स्टेडियमचे फॉलसिलिंग कोसळले. त्यावेळी या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. फॉलसिलिंग कोसळण्याचा प्रकार हा इमारतीच्या आतील प्रकार असला तरी जोरदार पावसाच्या दरम्यान हा प्रकार घडला.
तिळारी नदी धोक्याच्या पातळीजवळ
तिळारी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन तिळारी धरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
डिचोली तालुक्यात मुसळधार
डिचोली तालुक्यात मंगळवारीही मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. मात्र, स्थिती पूर्णपणे नियंत्रण असल्याची माहिती जलस्रोत खाते, अग्निशामक दलाचे अधिकारी व आपत्कालीन नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली. तालुक्यात अनेक सखल भागांत पाणी शिरले असून त्यामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाली. डिचोली, लाटंबार्से, नानोडा, खरपालसह इतर सखल भागांत रस्त्यावर पाणी साचले. मात्र, स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. नदीच्या पाणीपात्रात वाढ होत आहे. डिचोली अग्निशामक दलाचे जवान मदतकार्यात गुंतलेले आहे. मुसळधार पावसामुळे गणेश चतुर्थीच्या खरेदीवर मात्र परिणाम झाल्याचे जाणवले.
झुआरी पुलावर कार उलटली
मंगळवारी सकाळी पावसाचा जोर इतका प्रचंड होता की वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला. चालकांना पुढील रस्ताही फार अंधुक दिसत होता. त्यातच झुआरी पुलावर कारचालकाचे नियंत्रण गेल्यामुळे त्याची कार पलटली. सुदैवाने कुणी जखमी झाला नाही. एका
उद्योग भवन इमारतीचा सज्जा कोसळला
राजधानी पणजीत पाटोतील उद्योग भवन इमारतीचा सज्जा मंगळवारी सकाळी कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. मात्र हा सज्जा कोसळल्याने इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. उद्योग भवनाची इमारत जुनीच आहे. या इमारतीत उद्योग, व्यापार, आणि वाणिज्य संचालनालय आहे. तसेच माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे कार्यालय देखील येथे कार्यरत आहे. या इमारतीखाली हस्तकला मंडळाचे एक दुकानही आहे. याच दुकानावरील सज्जा कोसळला.
उणय नदीला पूर, निरंकाल पेण्यामळ रस्ता पाण्याखाली
गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे निरंकाल व दाभाळ गावातून वाहणाऱ्या उणय नदीला पूर आला. त्यामुळे पेण्यामळ-निरंकाल रस्ता पाण्याखाली गेला. त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. गेल्या काही वर्षांत नदीला पूर येऊन दाभाळ व निरंकाल या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. काल, सकाळी नऊच्या दरम्यान नदीची पाणीपातळी वाढली. नंतर काही वेळातच रस्ता पाण्याखाली गेला. पुराचे पाणी लोकवस्तीपर्यंत पोहोचण्याचा धोका आहे. दरवर्षी सोनू गावकर व मंगलदास गावकर यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचते. काल रस्ता पाण्याखाली गेला तरी त्यातूनच वाहतूक सुरू होती.