म्हापशात उद्या सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 07:31 IST2026-03-18T07:31:52+5:302026-03-18T07:31:52+5:30
या कार्यक्रमाबाबतची माहिती म्हापशात पत्रकार परिषदेत देण्यात आली.

म्हापशात उद्या सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: म्हापसा नववर्ष स्वागत समितीतर्फे गुरुवार, दि. १९ रोजी येथील टॅक्सी स्थानकावर २३ वा सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ६ वा. कार्यक्रमस्थळी उत्सवाचे अध्यक्ष श्रीनिवास धंपे (धंपे उद्योग समूहाचे अध्यक्ष) यांच्या हस्ते सार्वजनिक गुढी उभारली जाणार आहे.
या कार्यक्रमाबाबतची माहिती म्हापशात पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी संजय वालावलकर, प्राचार्य अनिल सामंत, सिद्धार्थ मांद्रेकर, दुर्गेश वेरेकर उपस्थित होते.
उत्सवाची सुरुवात पहाटे ५ वा. खोर्ली येथील देवी सातेरी चरणी श्रीफळ ठेवून व गाऱ्हाणे घालून खोर्ली भागातील लोक शोभायात्रेला सुरुवात करतील. तसेच विठ्ठलवाडी, दत्तवाडी, गणेशनगर, काणका, एकतानगर, आंगण, शेळवाडा, आल्त-म्हापसा वगैरे भागातून पारंपरिक वेशात भगवे झेंडे, दिंडी पथक, ढोल पथक, पंचारती घेऊन महिला शोभायात्रेत सहभागी होतील. स. ५:२० वा. मारुती मंदिराजवळ यांचे एकत्रीकरण होईल.
मारुतीरायाला श्रीफळ ठेवून व गाऱ्हाणे घालून शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. ही शोभायात्रा मारुती मंदिराला वळसा घालून टॅक्सी स्थानकावर ५:४५ वा. पोहचेल. त्यानंतर मुलांचे वेषभूषेचे सादरीकरण व प्रकट रंगावली कार्यक्रमाला सुरुवात होईल.
यावेळी डॉ. मीनाक्षी सहरावत (हरियाणा) (अध्यक्ष सनातन महासंघ) यांचे 'भारतीय संस्कृतीचे जीवनमंत्र आणि राष्ट्र निर्माणाची दिशा' यावर भाषण होईल. या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.