शेतकऱ्यांसाठी सुखद बातमी; थंडीमुळे आंबा-काजूंना भरघोस मोहर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 07:28 IST2025-12-31T07:28:00+5:302025-12-31T07:28:37+5:30
काणकोण तालुक्यात थंड व कोरडे हवामान ठरतेय वरदान

शेतकऱ्यांसाठी सुखद बातमी; थंडीमुळे आंबा-काजूंना भरघोस मोहर
लोकमत न्यूज नेटवर्क, पैंगीण : काणकोण तालुक्यात गेल्या सुमारे वीस दिवसांपासून जाणवत असलेली कडाक्याची थंडी काजू व आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून, यंदाचा बागायती हंगाम आशादायी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. तालुक्यातील अनेक भागांत काजू व आंब्याच्या झाडांना भरघोस मोहर फुटू लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
खोतिगाव पंचायतचे माजी सरपंच महादेव गावकर यांनी सांगितले की, सध्या असलेले थंड व कोरडे हवामान काजू व आंबा पिकांसाठी अतिशय पोषक आहे. पुढील पंधरवडाभर अशीच थंडी कायम राहिली आणि धुके अथवा अवकाळी पाऊस पडला नाही, तर यंदा समाधानकारक व भरघोस उत्पादन मिळण्याची दाट शक्यता आहे.
ऑक्टोबर महिन्यात उशिरा झालेल्या पावसामुळे काणकोण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची भातशेती कुजून मोठे नुकसान झाले होते. मात्र, नोव्हेंबरनंतर अचानक वाढलेल्या थंडीमुळे ग्रामीण तसेच शहरी भागात हवामानात बदल जाणवू लागला. विशेषतः ग्रामीण भागातील शेती क्षेत्रात आणि पोफळी कुळा घरामध्ये थंडीचा प्रभाव अधिक दिसून येतो.
शेतकऱ्यांसाठी सुखद बातमी
आंगोद येथील शेतकरी नारायण देसाई यांनी सांगितले की, गेल्यावर्षी दाट धुक्यामुळे मोहर करपून मोठे नुकसान झाले होते. मात्र यंदा थंडीमुळे मोहर जोमाने बहरलेला असून, चांगल्या उत्पन्नाची आशा निर्माण झाली आहे. एकूणच, सध्याची कडक थंडी काणकोण तालुक्यातील काजू व आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुखद बातमी ठरत आहे.
...तर चांगले उत्पादन मिळेल : महेंद्र पागी
काणकोण येथील कृषी खात्याचे विभागीय कृषी अधिकारी महेंद्र पागी यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेली थंडी आंबा, काजू तसेच इतर बागायती पिकांसाठी अनुकूल आहे. पुढील काही दिवस पाऊस किंवा दाट धुके न पडल्यास मोहर सुरक्षित राहून चांगले उत्पादन मिळू शकते. काजू पिकासाठी हिवाळ्यातील कमी तापमान व कोरडे हवामान फुलोऱ्यास उपयुक्त ठरते. तर आंब्यासाठी दिवसाचे १५ ते २० अंश आणि रात्रीचे १० ते १५ अंश तापमान फुलोऱ्यास पोषक मानले जाते. माजी सरपंच राजेश गावकर यांनी सांगितले की, उशिरा पडलेल्या पावसामुळे झालेले नुकसान काजू व आंबा हंगामात भरून निघेल, अशी अपेक्षा आहे. अनेक बागायतींमध्ये मोहर चांगल्या प्रकारे बहरत आहे.