कल्याणकारी योजनांमुळे जनता खूश: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; भाजपला यश मिळण्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:03 IST2025-12-19T12:03:10+5:302025-12-19T12:03:58+5:30
कुडणे-साखळी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

कल्याणकारी योजनांमुळे जनता खूश: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; भाजपला यश मिळण्याचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास व कल्याणकारी योजनांच्या बळावर गोमंतकीय जनता भाजपवर खूश आहे. त्याचा मोबदला मतदार मतदानातून भाजपला देतील, असे विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. बुधवारी सायंकाळी कुडणे-साखळी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
कारापूर सर्वण या मतदारसंघातील कुडणे पंचायत क्षेत्रासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोक आपल्या सोबतच असल्याचा दावा केला. व्यासपीठावर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, कुडणेचे सरपंच बाबला मळीक, सुभाष मळीक, पंचसदस्य राजन फाळकर, दामोदर पेटकर, कारापूर सर्वणचे सरपंच संतोष गुरव, प्रेमानंद म्हांबरे व इतरांची उपस्थिती होती.
साखळीवासीयांनी आपणास सदैव प्रेम दिले आहे. आज मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळताना साखळीवासीयांच्या या प्रेमाचा सदैव आपणास अभिमान आहे. केवळ साखळीवासीयांमुळेच आपण आज आमदार व मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारू शकलो. सर्व लोकांची जबाबदारी स्वीकारताना केवळ विकास व कल्याणासाठी कार्य करेन, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले की, गोव्यात तसेच डिचोली तालुक्यातील तीनही मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला विकास हा देदीप्यमान आहे. विविध विकास योजना मार्गी लावत असताना सर्व घटकांचा मुख्यमंत्र्यांनी विचार केला आहे. यावेळी सरपंच बाबला मुळीक, पंचसदस्य राजन फाळकर, सुभाष मुळीक, उमेदवार महेश सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ मळीक यांनी केले.