Goa will stop importing cows from foreign countries! | परराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार!

परराज्यांतून गोव्यात गायींची आयात करणे बंद होणार!

ठळक मुद्देआयसीएआरने गोव्याच्या कृषी क्षेत्रासाठी रोड मॅप तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावे, असा हेतू आहे.

पणजी : परराज्यांतून गोव्यात गायी आणणे टप्प्या-टप्प्याने बंद व्हायला हवे. भविष्यात ते बंद होईलही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे सांगितले. गोव्याच्या तांदळाची यापुढे गोव्याहून अन्यत्र निर्यात केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

आयसीएआरने गोव्याच्या कृषी क्षेत्रासाठी रोड मॅप तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावे, असा हेतू आहे. रोड मॅप तयार करण्यासाठी आतापर्यंत तीन बैठका घेतल्या गेल्या. तिन्ही बैठकांवेळी मुख्यमंत्री सावंत व कृषी खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी आयसीएआरला मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोमंतकीय शेतकरी त्यांचे उत्पन्न दुप्पट करू लागले आहेत. किमान तीन लाख तरी वार्षिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळायलाच हवे, असा आमचा प्रयत्न आहे. गोव्याहून यापुढे गोवन राईस अशा ब्रँण्ड नावाने तांदळाची निर्यात केली जाईल. दक्षिण व उत्तर गोव्यात तांदळाचे केंद्र उभे करून विविध जातींच्या तांदळाची निर्यात केली जाईल. गोवा राज्य सर्वच जीवनावश्यक वस्तूंबाबत अन्य राज्यांवर अवलंबून असल्याचे आम्हाला दिसून येते व लॉकडाऊनवेळी महामारी संकट काळात त्याची प्रकर्षाने जाणीव झाली.

दरम्यान, परराज्यांतून ज्या गायी गोव्यात आणल्या जातात, त्यांची आयात बंद होण्यासाठी अगोदर येथे गोव्याच्या गायीची जात विकसित व्हावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. टप्प्या-टप्प्याने आयात बंद होईल, असेही त्यांनी सांगितले.

काजू बोंडूपासून केण्डी 
गोव्यात प्रथमच काजूच्या बोंडूपासून केण्डी तयार करण्यात आली आहे. आयसीएआरने गोमंतकीय शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व त्यानंतर केण्डी तयार झाली आहे. ही केण्डी खाण्यासाठीही उत्तम आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Goa will stop importing cows from foreign countries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.