राज्यात धुलिवंदन उत्साहात; रंगांची उधळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:00 IST2026-03-04T11:58:59+5:302026-03-04T12:00:19+5:30
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्व मंत्री, आमदार, खासदार, आजी-माजी लोकप्रतिनिधी हे कार्यकर्त्यांसमवेत यात दंग झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

राज्यात धुलिवंदन उत्साहात; रंगांची उधळण
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राजधानी शहरासह राज्यात ठिकठिकाणी होळी उत्सव यंदाही पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी ठिकठिकाणी रंगांची उधळण झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्व मंत्री, आमदार, खासदार, आजी-माजी लोकप्रतिनिधी हे कार्यकर्त्यांसमवेत यात दंग झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने होळी आणि धूलिवंदन साजरे करण्यात आले. पणजीत मंगळवारी सकाळी महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. खासदार सदानंद शेट तानावडे यांनी पणजी शिमगोत्सव समितीचे शांताराम नाईक, मंगलदास नाईक आदींनी मंदिरात उपस्थित राहून महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, आझाद मैदानावर होळीच्या निमित्ताने गुलालोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान, होळीनिमित्त रंगोत्सवानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सकाळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रंगोत्सव साजरा केला. सकाळी आपल्या निवासस्थानी कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह तसेच नंतर रवींद्र भवन परिसरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत या रंगोत्सवात सहभागी झाले.