Goa SSC Result: गोव्यात दहावीचा ९९.७२ टक्के विक्रमी निकाल, २३,९६७ विद्यार्थ्यांपैकी केवळ एवढे विद्यार्थी नापास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 19:00 IST2021-07-12T18:59:36+5:302021-07-12T19:00:12+5:30
Goa SSC Result 2021: गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला असून बोर्डाच्या इतिहासात प्रथमच ९९.७२ टक्के एवढा विक्रमी निकाल लागलेला आहे.

Goa SSC Result: गोव्यात दहावीचा ९९.७२ टक्के विक्रमी निकाल, २३,९६७ विद्यार्थ्यांपैकी केवळ एवढे विद्यार्थी नापास
पणजी : गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला असून बोर्डाच्या इतिहासात प्रथमच ९९.७२ टक्के एवढा विक्रमी निकाल लागलेला आहे. २३,९६७ विद्यार्थ्यांपैकी २३,९00 उत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण ६७ विद्यार्थ्यांसाठी तीन आठवड्यांनंतर विद्यालय स्तरावर पुरवणी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेसाठी दहा दिवस आगाऊ कल्पना दिली जाईल.
गोवा बोर्डाचे चेअरमन भगिरथ शेट्ये यांनी काल सायंकाळी ५ वाजता पर्वरी येथे निकाल जाहीर केला. महामारीमुळे यंदा बोर्डाने लेखी परीक्षा घेतल्या नव्हत्या. पुरवणी परीक्षेसाठी नमुना पेपर बोर्डाकडून विद्यालयांना पुरविले जातील. विद्यालयांनी त्यांचे वेळापत्रक ठरवून या परीक्षा घ्यायच्या आहेत.
केवळ दोन मुली नापास
यावर्षी दहावीसाठी सर्वाधिक २३,९६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात १0,९५६ मुली होत्या त्यातील केवळ दोन मुली नापास झाल्या १0९५४ जणी उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ९९.९८ टक्के आहे. तर १३,0११ मुलगे होते त्यातील १२,९४६ उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्ण प्रमाण ९९.५ टक्के आहे.
- ३३ पेक्षा कमी गुण (अनुत्तीर्ण) : ६७
- ३३ ते ४५ गुण : २,२३१
- ४६ ते ५९ गुण : ७,00१
- ६0 ते ८0 गुण : १0,२७६
- ८१ ते १00 गुण : ४,३९२