GOA SIR: राज्यातील ९० हजार मतदारांची नावे वगळणार; ९ डिसेंबरला मतदारयादी जाहीर होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:51 IST2025-12-01T12:51:00+5:302025-12-01T12:51:00+5:30
GOA SIR: गोवा राज्यात एसआयआरचे काम आता पूर्णत्वाच्या जवळ आहे.

GOA SIR: राज्यातील ९० हजार मतदारांची नावे वगळणार; ९ डिसेंबरला मतदारयादी जाहीर होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात सध्या सुरू असलेल्या विशेष एसआयआर प्रक्रियेदरम्यान अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा डप्लिकेट आढळून आलेल्या जवळपास ९०,००० मतदारांची नावे वगळण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सीईओ संजय गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही मसुदा मतदार यादी ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
राज्यात एसआयआरचे काम आता पूर्णत्वाच्या जवळ आहे. मतदारांना वाटलेले ९६.५ टक्के अर्ज आधीच डिजिटायझेशन केलेले आहेत. राज्यातील ११.८५ लाख नोंदणीकृत मतदारांपैकी १०.५५ लाख अर्ज जमा झाले आहेत. तर फक्त ४०,००० अर्ज अद्याप जमा झालेले नाहीत. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ४ डिसेंबर आहे. छाननी केल्यानंतर मतदार यादी ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल. त्यावर दावे आणि हरकर्तीसाठी ९ डिसेंबर ते ८ जानेवारी २०२६ पर्यंत मुदत असेल, असेही गोयल यांनी सांगितले.
याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी सांगितले की, सुमारे २.२० लाख मतदारांच्या नोंदी २००२ च्या एसआयआर नोंदींशी जुळत नाहीत, याचे मुख्य कारण त्यांच्या पालकांची नावे पूर्वीच्या यादीत नसणे आहे. या मतदारांची नावे अजूनही मसुदा मतदार यादीत समाविष्ट केली जातील, परंतु त्यांना भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागतील. यामध्ये २००२ च्या एसआयआरमधील पालकांची माहिती किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने विहित केलेल्या इतर कागदपत्रांचा समावेश असेल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिली.
ते म्हणाले की, आमच्याकडे ८८ ओसीआय कार्डधारक नोंदणीकृत आहेत, ते भारताचे नागरिक आहेत आणि म्हणूनच मतदारांना पात्र आहेत, ज्यांनी पोर्तुगीज पासपोर्ट निवडला आहे, तो भारतीय नागरिक असल्याचे समजतो आणि म्हणून मतदान करण्यास पात्र नाही, असेही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले.