विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणा-या दिल्लीतील ठकसेनावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 19:41 IST2019-01-17T19:41:36+5:302019-01-17T19:41:40+5:30

विदेशात नोकरी देतो, असे सांगून युवकांना गंडा घालणारा मूळ नवी दिल्ली येथील मनोजकुमार याच्याविरुद्ध गोव्यातील मडगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

Goa : showed foreign countries bait, Crime registered against delhi man | विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणा-या दिल्लीतील ठकसेनावर गुन्हा

विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणा-या दिल्लीतील ठकसेनावर गुन्हा

मडगाव - विदेशात नोकरी देतो, असे सांगून युवकांना गंडा घालणारा मूळ नवी दिल्ली येथील मनोजकुमार याच्याविरुद्ध गोव्यातील मडगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. गुरुवारी सांयकाळी पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 420 कलमाखाली गुन्हा नोंदविला. संशयिताने मडगावात संपर्क सोल्युशन या नावाने कार्यालय थाटले होते. आखातात तसेच परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेक युवकांना गंडा घातला होता. मनोजकुमार हा मूळ नवी दिल्ली येथील असून, सदया राय येथे तो राहत आहे. त्याचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुमारे 40 युवकांना त्याने गंडा घातला असावा असा कयास आहे. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. संशयिताकडून गंडा घातलेली रक्कम लाखांच्या घरात आहे.

सुशांत कदम यांनी काल संशयिताविरुद्ध तक्रार नोंदविली. काल संशयिताकडून फसविले गेलेल्या युवकांनी मडगाव पोलीस ठाणे गाठले होते. मात्र कुणीही तक्रार देण्यास पुढे न आल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदविला नव्हता. काल कदम यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला. विदेशात नोकरी देण्याच्या जाहिराती त्यांनी केली होती. या जाहिरातील भुलून अनेक युवकांनी त्याच्याकडे नोकरीसाठी पैसे दिले होते.

फसवणूक झालेल्यामंध्ये केवळ गोव्यातील नव्हे तर उत्तर प्रदेश राज्यातील युवकाचाही समावेश आहे. परराज्यातील युवकांनेही मनोजकुमार याने गंडा घातला असल्याने फसवणुकीची रक्कम करोडोंच्या घरातही जाण्याची शक्यता आहे. आखाती प्रदेशात कुवेत, दुबई बरोबरच कॅनेडा येथे नोकरी मिळवून देतो, असे सांगून युवकांकडून वीस हजार तर काही जणांकडून पंचवीस ते सत्तर हजार रुपयेही घेतले होते. वर्ष होऊन गेले तरी नोकरी मिळत नसल्याने काहीजणांनी मनोजकुमार याला गाठून आपले पैसे परत देण्यास सांगितले होते. त्यानुसार त्याने धनादेशही दिले होते. मात्र बँकेत त्याच्या अकांउटवर पैसेच नसल्याने हे धनादेश वठविले गेले नाही.

त्यामुळे काहीजणाने त्याला कार्यालयात गाठून जाबही विचारला होता. बुधवारी आपण दुपारी भेटू असे आश्वासनही त्याने दिले होते. त्यानुसार काही युवक मनोजकुमार याच्या मडगावातील कार्यालयात दुपारी गेले असता, ते तेथे नसल्याचे आढळून आले. मागाहून या संतप्त युवकांनी मडगाव पोलीस ठाणो गाठून तेथील अधिका-यांकडे आपली कैफियत मांडली होती.  मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर पुढील तपास करीत आहेत.
 

Web Title: Goa : showed foreign countries bait, Crime registered against delhi man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.