IFFI 2025 चित्रपट महोत्सवासाठी राजधानी सजली; उद्या होणार उद्घाटन, रंगीत तालीम झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 10:40 IST2025-11-19T10:40:06+5:302025-11-19T10:40:06+5:30
इएसजी परिसरात विद्युत रोषणाई

IFFI 2025 चित्रपट महोत्सवासाठी राजधानी सजली; उद्या होणार उद्घाटन, रंगीत तालीम झाली
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राजधानीत उद्या, गुरुवारी ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची दिमाखात सुरुवात होणार आहे. २० ते २८ नोव्हेंबर या दरम्यान हा सोहळा होणार असून त्यात बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी असणार आहे. 'इफ्फी'ची तयारी अंतिम टप्प्यात आली असून शहरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काल, मंगळवारी उद्घाटन सोहळ्याची रंगीत तालीम घेण्यात आली.
उद्घाटन सोहळ्यानिमित्त जुने सचिवालय ते कला अकादमी या परिसरात परेड होणार आहे. सरकारी पातळीवर या तयारीचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. उद्घाटन परेडला अनेक कलाकार उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. 'द ब्लू ट्रेल' या चित्रपटाने इफ्फीची सुरुवात होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शक ब्राझिलियन लेखक गॅब्रिएल मस्कारो हे परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
इफ्फीनिमित्त पणजीसह राज्यातील काही भागांमध्ये चित्रपटांचे स्क्रीनिंग होईल. याशिवाय मास्टर क्लास, ओपन फोरम तसेच अन्य कार्यक्रमांमध्येही चित्रपटप्रेमींना भाग घेऊन कलाक्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा करता येईल. इफ्फीचा समारोप रत्वापूम बूनबंचचोके यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'अ युजफूल घोस्ट' या चित्रपटाने होईल.
समारोप सोहळ्यात रजनीकांतचा सन्मान
समारोप सोहळ्याला दिग्गज अभिनेते रजनीकांत उपस्थित असतील. रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांना सन्मानित केले जाईल. भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल प्रसिद्ध अभिनेते नंदामुरी बालाकृष्ण (एनबीके) यांचा देखील सन्मान केला जाईल. या व्यतिरिक्त इफ्फीत भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज गुरूदत्त, राज खोसला, ऋत्विक घटक, पी. भानुमती, भूपेन हजारिका आणि सलिल चौधरी यांचे शताब्दी वर्ष साजरे केले जाणार आहे.
७ हजारांवर प्रतिनिधींची नोंदणी
इफ्फीसाठी आतापर्यंत देश-विदेशांतील प्रतिनिधींची संख्या मिळून ७ हजार वर पोहोचली आहे. अजूनही प्रतिनिधींची नोंदणी सुरूच असून ही संख्या १० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. इफ्फीला यंदा तब्बल ८४ देशांतील २७० चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. महोत्सवाची सुरुवात ब्राझीलमधील दिग्दर्शक गेब्रिएल मस्कारो यांच्या द ब्ल्यू ट्रेल या विज्ञान-काल्पनिक चित्रपटाने होणार आहे. यंदाच्या इफ्फीत जपान कंट्री-ऑफ-फोकस, स्पेन भागीदार देश, तर ऑस्ट्रेलिया स्पॉटलाईट देश म्हणून निवडण्यात आला आहे.
महोत्सवातील १९ व्या व्हेव्ज फिल्म बाजारमध्ये स्क्रीनरायटर्स लॅब, को-प्रॉडक्शन मार्केट, व्ह्यूइंग रूम लायब्ररी आदी विभागांत ३०० पेक्षा अधिक फिल्म प्रकल्प सादर केले जातील. को-प्रॉडक्शन मार्केटमध्ये २२ फीचर फिल्म्स आणि ५ डॉक्युमेंटरीज सहभागी होणार आहेत.