दिल्ली स्फोटानंतर गोवा अलर्टवर; सुरक्षेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 08:48 IST2025-11-12T08:48:22+5:302025-11-12T08:48:56+5:30
विविध ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

दिल्ली स्फोटानंतर गोवा अलर्टवर; सुरक्षेत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :दिल्लीत सोमवारी झालेल्या कार स्फोटाच्या घटनेनंतर राज्यातही सरकारने अलर्ट जारी केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत सोमवारी रात्रीपासूनच वाढ करण्यात आली आहे. विविध ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
राज्यातील सर्व रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक नाक्यावर, चेकपोस्टवर, समुद्र किनाऱ्यांवर शस्त्रधारी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींवर संशय आहे, त्यांची व साहित्याची तपासणी केली जात आहे. महत्त्वाच्या शहरांमध्ये पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे. वाहने अडवून त्यांची तपासणी केली जात आहे.
याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, दिल्लीत घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. त्या दुर्घटनेत अनेकांचे प्राणही गेले आहेत. आम्ही त्या कुटुंबांसोबत आहोत. गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील घटनास्थळी पोहोचत घटनेचा आढावा घेतला आहे. दोषींवर कडक कारवाई होणार आहे.
राज्यात तशा प्रकारचा कडक अलर्ट नाही. पण, अशी घटना घडल्यानंतर सर्व राज्ये ज्या उपाययोजना करीत आहेत, त्याच आमच्या राज्यातही केल्या जात आहेत. सुरक्षेचे सर्व निकष पडताळले जात आहेत. राज्यातील लोकांची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती पार पाडत आहोत.