महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 18:25 IST2025-12-22T18:24:41+5:302025-12-22T18:25:43+5:30
Goa Local Body Election Result: आज लागलेल्या गोव्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. तर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची पीछेहाट झाली आहे.

महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंयायत निवडणुकीच्या रविवारी लागलेल्या निकालांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली होती. तसेच या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आणत भाजपा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. त्यानंतर आज लागलेल्या गोव्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. तर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची पीछेहाट झाली असून, राज्यात बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत असलेल्या आम आदमी पक्षाचा धुव्वा उडाला आहे.
गोव्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपा, काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड पक्ष, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या पक्षांच्या उमेदवारांमध्ये मुख्य चुरस दिसून आली. या निवडणुकीमध्ये एकूण २२६ उमेगवार रिंगणात होते. सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ३४ जागांचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजपाने २० जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने ८ जागा जिंकल्या आहेत. गोवा फॉरवर्ड, मगोप आणि रिपब्लिकन गोवन्स पक्षांना प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. तर ३ जागांवर अपक्षांनी विजय मिळवला आहे.
गोव्यात झालेली जिल्हा परिषदेची ही निवडणूक राज्यात २०२७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान, आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाची बहुमताकडे वाटचाल होत असल्याचे संकेत मिळत असल्याने भाजपासाठी हे मोठं यश मानलं जात आहे.