लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :रेल्वे मंत्रालयाने कर्नाटकातील होस्पेट ते तिनाईघाट अशा ३१२ किमीचा मार्गाचे काम पूर्ण झाल्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. हा मार्ग गोव्यात वास्कोपर्यंत विस्तारणाऱ्या ३६३ किमीच्या मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे. होस्पेट-वास्को मार्गाच्या दुहेरी ट्रॅकिंगमुळे कोळसा, लोहखनिज आणि स्टीलसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला लक्षणीयरीत्या गती मिळेल अशी अपेक्षा आहे असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, डबल ट्रॅकिंगमुळे फक्त गोव्यातील उद्योगांनाच फायदा होणार नाही तर राज्याची देशाच्या इतर भागांशी कनेक्टिव्हिटीदेखील वाढेल. या प्रकल्पामुळे गोवा आणि हंपीमधील पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण जलद आणि अधिक कार्यक्षम रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटकांना या लोकप्रिय ठिकाणांना भेट देणे सोपे होईल. या विकासासह, गोवा सुधारित पायाभूत सुविधा आणि वाढीव आर्थिक व्यवहार वाढीस लागतील असा दावा रेल्वे मंत्रालयाकडून तसेच राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, 'डबल इंजिन' सरकार रेल्वेचे डबल ट्रॅकिंग वापरून कोळसा वाहतूक करणार हे स्पष्ट झाले आहे, असा आरोप करत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी या सरकारने लोकांच्या भावनांशी खेळ केला आहे असा हल्लाबोल केला.
हा गावे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न : सरदेसाई
गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी भाजप सरकार डबल-ट्रॅकिंग प्रकल्पाद्वारे वाढीव कोळसा वाहतुकीला परवानगी देऊन गोव्यातील गावे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्रालयाने अखेर या प्रकल्पाचा खरा उद्देश हा कोळसा वाहतूक सुलभ करणे हे मान्य केला आहे. हा प्रकल्प कोळसा वाहतुकीसाठी होता हे पूर्वी सरकारने नाकारले. या प्रकल्पामुळे राज्यात प्रदूषण आणखी वाढेल. विशेषतः कोळसा प्रदूषणाने आधीच उद्ध्वस्त झालेल्या मुरगावसारख्या भागात अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होईल. वेळसाव ते कुळेपर्यंतची गावे या प्रकल्पामुळे प्रभावित होतील. सरकारने त्यांच्या योजनांचा पुनर्विचार करावा. सरदेसाई यांनी डबल-ट्रॅकिंग प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबद्दल चिंता अधोरेखित केली.
सरकार असंवेदनशील : आलेमाव
दरम्यान, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, 'दुहेरी ट्रॅकिंग कोळसा वाहतुकीसाठी आहे हे केंद्र सरकारने मान्य केले आहे. आधीच, कोळसा वाहतुकीमुळे मुरगावचे लोक त्रस्त आहेत. लोकांच्या विरोधाला न जुमानता, डबल इंजिन सरकार डबल ट्रॅकिंग वापरून कोळसा वाहतूक करणार हे स्पष्ट झाले. राज्यातील भाजप सरकारने लोकांच्या भावनांशी खेळ केला. पोलिस तक्रारी दाखल करून लोकांना आंदोलनांपासून रोखण्याचा प्रयत्न केला. गोवा नष्ट करण्यासाठी आणि लोकांचे आरोग्य बिघडवण्यासाठी प्रकल्प आणणाऱ्या असंवेदनशील सरकारला लाज वाटली पाहिजे.