Goa Investment Promotion Board CEO quits, citing red-tapism | गोवा आयपीबीच्या सीईओंचा राजीनामा, लालफितीतील कारभाराला दोष
गोवा आयपीबीच्या सीईओंचा राजीनामा, लालफितीतील कारभाराला दोष

पणजी - गोवा सरकारच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (आयपीबी) मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा (सीईओ) विशाल प्रकाश यांनी बुधवारी (11 सप्टेंबर) राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले राजीनामा पत्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कार्यालयास सादर केले आहे. मुख्य सचिवांनाही ते पत्र मिळाले आहे.

मुख्यमंत्री सावंत हे आयपीबीचे चेअरमन आहेत. उद्योग मंत्री व माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. राज्यात येऊ पाहणाऱ्या उद्योगांना, हॉटेल व अन्य प्रकल्पांना मंजुरी देण्याची जबाबदारी मंडळावर आहे. मंडळाची गाडी नीट चालत नसल्याची टीका अधूनमधून होत होती. अर्थात त्यास सीईओ जबाबदार नाही. सीईओ प्रकाश यांनी सविस्तरपणे आपले राजीनामा पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी सरकारच्या लालफितीतील कारभारावर बोट ठेवले आहे. यावरून राज्यातील उद्योजकांनाही स्थितीची कल्पना येते.

माझे कौशल्य आणि अनुभव यामुळे आयपीबीच्या कारभारात बदल होईल असे मला वाटले होते पण व्यवसायिक ज्या लालफितीतील कारभाराविषयी तक्रारी करतात, त्याच कारभारास मला तोंड द्यावे लागते, अशी खंत विशाल प्रकाश यांनी व्यक्त केली आहे. वायब्रंट गोवा ही ग्लोबल एक्सो परिषद यापुढील महिन्यात गोव्यात पार पडणार आहे, तत्पूर्वीच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या सीईओंचा राजीनामा आल्याने उद्योग वतरुळात तो चर्चेचा विषय बनला आहे.

सावंत हे आयपीबीचे चेअरमन झाल्यानंतर आयपीबीची एकच बैठक झाली. केपीएमजी या आयपीबीच्या सल्लागार यंत्रणेला सरकारने दिलेले शूल्क व त्या यंत्रणेचे काम यावर गेल्या अधिवेशनात बरीच टीका झाली आहे. स्व. मनोहर पर्रीकर हे मार्च 2012 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या काळात पर्रीकर यांनीच आयपीबीची स्थापना केली होती. जलदगतीने उद्योजकांना त्यांच्या प्रकल्पांसाठी मान्यता मिळावी असे अपेक्षित होते पण आयपीबीचा कारभार हा अनेकदा वादाचाच विषय ठरला.

 


Web Title: Goa Investment Promotion Board CEO quits, citing red-tapism
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.