महाराष्ट्र निवडणुकीनिमित्त गोव्यात भरपगारी सुट्टी देण्यास गोवा फॉरवर्डचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 21:24 IST2019-10-20T21:24:08+5:302019-10-20T21:24:31+5:30
महाराष्ट्रात उद्या सोमवारी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी गोवा सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे.

महाराष्ट्र निवडणुकीनिमित्त गोव्यात भरपगारी सुट्टी देण्यास गोवा फॉरवर्डचा आक्षेप
पणजी : महाराष्ट्रात उद्या सोमवारी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी गोवा सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. सर्वसाधारण प्रशासन विभागाचे सचिव गौरीश कुर्टीकर यांनी १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १३५ ब च्या उपकलम १ नुसार हा आदेश काढला आहे. औद्योगिक आस्थापनांमध्ये, सरकारी कार्यालयात काम करणारे तसेच व्यावसायिक आस्थापनांमधील कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी या सर्वांना ही भरपगारी सुट्टी लागू आहे. ज्यांचे मतदान महाराष्ट्रात आहे त्यांना या भरपगारी रजेचा लाभ घेता येईल.
गोवा फॉरवर्डचा आक्षेप
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनिमित्त गोव्यात काम करणा-या महाराष्ट्रीयन लोकांना भरपगारी रजा देण्याचा जो आदेश काढण्यात आला आहे त्यास गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाशिवाय असा निर्णय घेतलाच कसा असा सवाल करुन सरदेसाई म्हणतात की, गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याच्या प्रश्नावर १६ जानेवारी १९६७ रोजी सार्वमत घेण्यात आले त्यात गोमंतकीयांना विलिनीकरणाविरोधात कौल दिला होता याची आठवण सरकारला करुन देण्याची गरज आहे.’