Goa Election 2022 : "उत्पल पर्रीकर यांनी थांबणे गरजेचे; भाजप नेते, कार्यकर्त्यांकडून कायम देशहिताला प्राधान्य"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 17:01 IST2022-01-23T17:00:51+5:302022-01-23T17:01:20+5:30
"उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी पक्ष सोडणे दुर्दैवी आहे."

Goa Election 2022 : "उत्पल पर्रीकर यांनी थांबणे गरजेचे; भाजप नेते, कार्यकर्त्यांकडून कायम देशहिताला प्राधान्य"
पणजी : लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पक्षाने दोन वेळा अध्यक्ष केले. मुख्यमंत्रीपद दिले. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी पक्ष सोडणे दुर्दैवी आहे. आपल्याला तिकीट नाकारली म्हणून आपण पक्ष सोडला नाही असे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
उत्पल पर्रीकर यांनी थांबणे गरजेचे आहे. आपण विद्यमान आमदार असतानाही २०१२ साली आपणाला पक्षाने उमेदवारी नाकारली. तरीसुद्धा आपण पक्षात राहिलो. पक्ष सोडला नाही. भाजप नेते व कार्यकर्ते यांनी नेहमीच स्वतःच्या हितापेक्षा देशहिताला आणि पक्ष हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पक्ष नेत्यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्षापासून दूर न जाता पक्षासाठी काम करावे आणि पक्षाला सत्तेवर आणावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये, महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार ॲड.नरेंद्र सावईकर उपस्थित होते. तानावडे म्हणाले, की "भाजपाने पहिल्यांदाच गोव्यातील चाळीसही मतदारसंघात उमेदवार ठेवण्याचे ठरवले असून ३४ उमेदवार जाहीर केले आहेत." इतर पक्ष स्वतः जिंकण्यासाठी लढत नसून फक्त ते भाजपला हरवण्यासाठी लढत आहेत. भाजपला हरवणे हा त्यांचा एकमेव अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.
शाह, गडकरीही गोव्यात येणार
गोव्यात दाखल झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस व गोवा प्रभारी सी. टी. रवी हे भाजप उमेदवारांसोबत चर्चा करणार आहेत. येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी या गोव्यात दाखल होऊन भाजपाच्या प्रचारात भाग घेणार आहेत, अशी माहिती तानावडे यांनी यावेळी दिली.