जि. पं. निवडणूक: काँग्रेस, आरजी, फॉरवर्ड युती दृष्टिपथात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:00 IST2025-11-26T12:00:48+5:302025-11-26T12:00:48+5:30

नेत्यांकडून भूमिका स्पष्ट, सरदेसाईंकडून जागा वाटप फॉर्म्युला सादर; 'आप'चे एकला चलो

goa district panchayat election now congress rg goa forward alliance in sight | जि. पं. निवडणूक: काँग्रेस, आरजी, फॉरवर्ड युती दृष्टिपथात

जि. पं. निवडणूक: काँग्रेस, आरजी, फॉरवर्ड युती दृष्टिपथात

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: जि. पं. निवडणुकीसाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व आरजीची युती आता दृष्टिपथात आली आहे. भाजपविरोधात एकत्र यायला हवे, असे तिन्ही विरोधी पक्षांना तीव्रपणे वाटू लागले आहे. संपूर्ण गोव्याचेही युतीकडे लक्ष आहे. काल राजकीय नेत्यांनी युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

तर काँग्रेसचे काही जागांवर उमेदवार निश्चित झाल्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. युतीच्या बाबतीत मित्रपक्षांची जागा वाटपाबाबत बोलणी चालू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी युतीसाठी काँग्रेससमोर ३०:१०:१० असा जागा वाटपाचा फॉर्म्युला मांडला आहे.

आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी मंगळवारी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना युतीबाबत दुजोरा दिला. राखिवतेच्या विषयावर हायकोर्टाचा निवाडा आल्यानंतर युती व जागावाटप जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'जागावांटपाच्या बाबतीत समझोता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हायकोर्टाने निवाडा दिल्याशिवाय राखीवतेबद्दल स्पष्टता येणार नाही त्यामुळेच आम्ही थांबलोय.' आम आदमी पक्षदेखील विरोधकांच्या या युतीत सहभागी होऊ शकतो का? असा प्रश्न केला असता मनोज म्हणाले की, 'भविष्यात काहीही होऊ शकते.

गोव्यातील जनतेची सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे अशी भूमिका आहे व सर्वांचे याकडे लक्ष आहे. गेले पंधरा दिवस आमच्या बैठका चालू आहेत. मित्रपक्षांकडे आम्ही आजही फोनवर बोललो. आमच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबत स्पष्ट केले. हायकोर्टाने आरक्षण याचिकेवर निवाडा राखून ठेवला आहे. कोणताही पक्ष अशा स्थितीत उमेदवार जाहीर करू शकत नाही. आमचे उमेदवार तयार आहेत. मित्रपक्षांकडे जागा वाटपाबबत समझोता झाल्यानंतर एकत्रपणे ते जाहीर केले जाईल.'

आरजी, आपची विचारधारा एक : वेंझी व्हिएगश

दरम्यान, आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगश यांनी आप व आरजीची विचारधारा एक असल्याचे विधान केले आहे. ते म्हणाले की, 'पक्षांतरे करणाऱ्यांना स्थान दिलेले दोन्ही पक्षांना नको. भविष्यात आपने आरजीसोबत जावे का, याबाबतचा निर्णय पक्षांच्या कोअर कमिटीने एकत्र येऊन घेता येईल.'

सरदेसाई यांची निवडणूक आयोगावर टीका

दरम्यान, 'न्यायालयात जिल्हा पंचायत निवडणुकीबद्दल खटला सुरू असताना केवळ एक नोटीस काढून राय तसेच कुंकळ्ळीसारख्या जागा राखीव कशा केल्या जाऊ शकतात? असा प्रश्न गोवा फॉरवर्डचे आमदार सरदेसाई यांनी राज्य निवडणूक आयोगाला केला. ते म्हणाले की, 'सत्तारूढ भाजपने आपली यादी आधी जाहीर करावी. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे दलबदलू लोकांना तिकीट देणार नाही असे म्हणतात. पण त्यांना मी आठवण करू देऊ इच्छितो की त्यांच्या मंत्रिमंडळात ९० टक्के लोक दलबदलू आहेत. सरकार जिल्हा पंचायत निवडणुका टाळू पाहत आहे. दरम्यान, नोकरी घोटाळा प्रकरणावर सरदेसाई म्हणाले की, मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर यांना भाजपने जि. पं. निवडणुकीसाठी फक्त तीन जागा दिल्या, हे हास्यास्पद आहे. ढवळीकर यांचे नाव काही प्रकरणांमध्ये गुंतवून त्यांनी मुस्कटदाबी केली जात आहे, असा आरोप सरदेसाईनी केला.

मगोप भाजपसोबतच

दरम्यान, मगो पक्ष जिल्हा पंचायत निवडणूक भाजपसोबत युतीनेच लढवणार आहे. मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, जागा वाटपाबाबत निर्णय हायकोर्टाच्या राखीवताविषयक निवाड्यानंतरच जाहीर केला जाईल.

भाजपची बैठक

दरम्यान, भाजपने मंगळवारी बैठक घेतली. चिंबल व सांताक्रुझच्या उमेदवारांबाबत आमदार रुडॉल्फ फर्नाडिस यांच्याशी चर्चा केली. पक्षाने उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांच्या निवडीसाठी बैठकीची प्रक्रिया आधीच पूर्ण केली आहे.

काँग्रेसचे काही जागांवर उमेदवार निश्चित

'काँग्रेसने काही जागांवर उमेदवार निश्चित केले असून लवकरच यादी जाहीर केली जाईल. युतीच्या बाबतीत मित्रपक्षांची जागा वाटपाबाबत बोलणी चालू आहेत,' असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. काँग्रेसची सोमवारी महत्त्वाची बैठक झाली. पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर मंगळवारीही या विषयावर पुन्हा बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले.

'काँग्रेस पक्षासोबत लवकरच जागा आणि युतीबद्दल सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल' अशी माहिती गोवा फॉरवर्डचे नेते, आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावात दिली. ते म्हणाले की, जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ३०:१०:१० असा फॉर्म्युला मी मांडला आहे. त्या अनुषंगाने चर्चा चालू आहे. सरदेसाई म्हणाले की, आम्ही काँग्रेस पक्षाकडे एक प्रस्ताव मांडला. जिल्हा पंचायत निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्षाला १०, आरजी पक्षाला १० आणि काँग्रेस पक्षाला ३० जागा असे सूत्र सुचविले आहे. लवकरच आम्ही पुन्हा बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ. काही जागांवर आम्हाला आमचा उमेदवार चांगला वाटतो. आणि काँग्रेसला त्यांचा उमेदवार चांगला वाटतो. मात्र आम्ही चर्चा करून त्यावर निर्णय घेऊ.

'विरोधकांची युती व्हावी यासाठी लोकांचा दबाव आहे. जागा वाटपात भावनिक बनून चालणार नाही. माणसे आणून गर्दी करणाऱ्या धनदांडग्यांना तिकट देऊन चालणार नाही. ज्या पक्षाचा बूथ मजबूत आहे, त्यालाच ती जागा मिळायला हवी. २०२७ ची विधानसभा निवडणूक नजरेसामेर ठेवूनच जागा वाटप करायला हवे.' - मनोज परब, रिव्होल्यूशनरी गोवन्स

ज्या जागांबाबत मित्रपक्षांचा दावा नाही किंवा ज्या जागा मोकळ्या आहेत. तेथे काँग्रेस आपले उमेदवार जाहीर करणार आहे. आरजीकडे आमची सोमवारी अंतर्गत बोलणी झालेली आहे. गोवा फॉरवर्डकडेही आता आम्ही बोलणार आहोत.- अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस.

सध्यातरी जिल्हा पंचायत निवडणुकीत आपने 'एकला चलो रे' भूमिका घेतली आहे. जनतेने आमचे सदस्य निवडून देऊन एक वर्ष आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. जर योग्य काम केले नाही तर २०२७ च्या निवडणुकीत काय तो निर्णय घ्यावा.' - वेंझी व्हिएगश, आप.

 

Web Title : गोवा जिला पंचायत चुनाव: कांग्रेस, आरजी, फॉरवर्ड गठबंधन की उम्मीद

Web Summary : गोवा जिला पंचायत चुनावों के लिए कांग्रेस, गोवा फॉरवर्ड और आरजी का गठबंधन करीब। सीटों के बंटवारे पर बातचीत जारी है। अंतिम घोषणा से पहले आरक्षण पर उच्च न्यायालय के फैसले का इंतजार।

Web Title : Goa ZP Election: Congress, RG, Forward Alliance in Sight

Web Summary : Congress, Goa Forward, and RG alliance for Goa Zilla Panchayat elections nears. Seat sharing talks are ongoing. High Court verdict on reservations awaited before final announcement. AAP may join later.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.