शिक्षण क्षेत्रात गोवा बोर्डाकडून नवा 'बेंचमार्क': मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:25 IST2026-02-10T12:24:56+5:302026-02-10T12:25:45+5:30
विद्यार्थ्यांमधील गुण ओळखण्याचे आवाहन

शिक्षण क्षेत्रात गोवा बोर्डाकडून नवा 'बेंचमार्क': मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : 'गोवा बोर्डाने प्रश्नपत्रिका तयार करणे आणि एकूणच कामकाजात 'बेंचमार्क' (मानक) स्थापित केले आहे. बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता आणि जबाबदारी सातत्याने राखली गेली आहे. पूर्वी निकाल ६३ ते ७० टक्के दरम्यान असायचा, तो आता ९८ टक्क्यांपर्यंत लागतो' असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
येथे गोवा उच्च आणि माध्यमिक मंडळाच्या नव्याने सौंदर्याकरण केलेल्या वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार दाजी साळकर, मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये, शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे उपस्थित होते.
'सर्वच विद्यार्थी डॉक्टर किंवा इंजिनिअर बनू शकत नाहीत' असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे टॅलेंट ओळखावे. हे मार्गदर्शन पालकांपेक्षा शिक्षकांकडून मिळणे अधिक गरजेचे आहे. आर्किटेक्चर आणि आर्ट कॉलेजचे प्रकल्प आता अंतर्गत स्तरावर हाताळले जात आहेत. यामुळे सरकारचा २ टक्के कन्सल्टन्सी खर्च वाचत असून, गोमंतकीय कलेलाही प्रोत्साहन मिळत आहे. जीएसआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागांना गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या टॅलेंटचा जास्त वापर करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.'
अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी प्रास्ताविक केले. गुरुकुल मॉडेल, ज्ञानद्वार संकुलाचे उद्घाटन, बोधचिन्ह आणि हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्डचे अनावरण आले. शिक्षक, कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सामंत विद्यालयाच्या मुलांनी स्वागत गीत गायले. सुभाष जाण यांनी सूत्रसंचालन केले.
आयटीआय शिक्षण घेतल्यास...
'आठवी पास मुलांनी आयटीआयची दोन वर्षे पूर्ण केली तर त्यांना १० वीचे प्रमाणपत्र आणि दहावी पास मुलांनी आयटीआयची दोन वर्षे पूर्ण केली असतील तर त्यांना १२वी पास प्रमाणपत्र देण्यात येईल. आमच्या मानवी संसाधन मंडळातर्फे अशा मुलांना पोलिस किंवा इतर खासगी आस्थापनात नोकरीची संधी मिळेल', असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
विकसित राज्याचे स्वप्न..: मंत्री रोहन खंवटे
पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, 'गोवा उच्च व माध्यमिक मंडळाने आपल्या पन्नास वर्षांच्या कालावधीत उत्तम कार्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत घडवण्याचे स्वप्न तसेच विकसित गोवा राज्य घडवण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर आपण मुलांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी मुलांच्या शैक्षणिक भविष्याकडे पूर्णपणे लक्ष देणे ही काळाची गरज आहे.'
५० वर्षांचा रोडमॅप
मुख्यमंत्री म्हणाले की 'विकसित भारत २०४७' चे स्वप्न साकार करण्यासाठी गोव्यातील शाळांच्या इमारती आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सज्ज केले जाईल.
भविष्यात झेन-जी, झेन-एक्स पिढीने डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. हीच खरी वेळ आहे की मुलांचा शिक्षणाचा पाया पुढील पन्नास वर्षांकरिता तयार करता येईल.
शिक्षकांनी विद्यार्थ्यामधील शैक्षणिक तसेच इतर प्रकारातील कौशल्य पाहून त्यांना तयार करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि हे निश्चित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.