विरोधकांचा गदारोळ; आमदारांना काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 08:11 IST2026-01-13T08:10:41+5:302026-01-13T08:11:05+5:30
या गोंधळातच राज्यपालांनी भाषण चालू ठेवले.

विरोधकांचा गदारोळ; आमदारांना काढले बाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी राज्यपाल पी. अशोक गजपती राजू अभिभाषणासाठी उभे राहिले असता विरोधी आमदारांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. हडफडेतील नाईट क्लब दुर्घटना प्रकरणी राज्यपालांनी सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी करून हातात काळे फलक फडकावून निषेध केला.
या गोंधळातच राज्यपालांनी भाषण चालू ठेवले. त्यामुळे संतप्त विरोधकांनी हौद्यात धाव घेतली. अखेर मार्शलनी त्यांना सभागृहाबाहेर काढले. राज्यपाल अभिभाषणास उभे राहिले असता विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हस्तक्षेप करून हडफडे नाईट क्लब दुर्घटनाप्रकरणी राज्यपालांनी निवेदन करावे, अशी मागणी केली. ही दुर्घटना नसून सरकारने २५ जणांचा केलेला खून आहे, अशी टीका यांनी केली.
काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाच्या मिळून सातही विरोधी आमदारांनी सरकारच्या निषेधाचे काळे फलक हातात घेऊन सभापतींच्या आसनासमोरील हौद्यात धाव घेतली. सभापती गणेश गावकर यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु, विरोधक त्यांचे काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शेवटी गदारोळ वाढल्याने सभापतींनी मार्शलकरवी सातही विरोधी आमदारांना सभागृहाबाहेर काढले.
विरोधकांचे टीकास्त्र
पत्रकारांशी त्यानंतर बाहेर बोलताना युरी आलेमाव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 'राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. गोवा संकटाचा सामना करीत असून, गुन्हेगारीची राजधानी बनला आहे. राज्यपालांनी बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर किंवा बर्च आगीच्या दुर्घटनेप्रश्नी कोणतेही भाष्य केले नाही. सरकारने भाषणात स्व-स्तुतीवरच भर दिला.'
ही तर धूळफेक : सरदेसाई
पत्रकारांशी बोलताना आमदार विजय सरदेसाई यांनीही हडफडे नाईट क्लब आगीबद्दल सरकारवर टीका केली. सरकार 'डोळ्यात धूळफेक' करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. भर मिठागरात बांधलेल्या नाईट क्लबमध्ये घडलेल्या अग्निकांडाने गोव्याची प्रतिमा मलिन केली आहे.'
आप आमदार वेंझी व्हिएगश म्हणाले की, हडफडे नाईट क्लब दुर्घटनेबाबत राज्यपालांनी कोणतेही भाष्य केले नाही हे योग्य नव्हे. आरजीचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, 'सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यपालांनी या मुद्द्यावर लक्ष द्यायला हवे होते आणि मंत्र्यांनी या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे.' बोरकर यांनी नाईट क्लब दुर्घटना प्रकरणी अहवालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दुर्घटनेतील बळींना श्रद्धांजली
दरम्यान, हडफडे आग दुर्घटना, शिरगाव जत्रा चेंगराचेंगरी तसेच रस्ता अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना विधानसभेने श्रद्धांजली वाहिली. सभागृहात अधिवेशनादरम्यान एक मिनिट मौन पाळण्यात आले.