लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : कोंकणीबरोबरच मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा, ही मागणी अनेक वर्षापासून मराठीप्रेमींकडून होत आहे. या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष करू नये. येत्या सप्टेंबरपर्यंत सरकारने मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा; अन्यथा त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होईल आणि आम्ही सरकारविरोधात भूमिका घेऊ, असा इशारा मराठी राजभाषा निर्धार समितीचे मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांनी दिला.
फोंडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला दिवाकर शिंक्रे, डॉ. अनिता तिळवे, विठ्ठलदास नागवेकर, उदय डांगी, हनुमंत नाईक व गोविंद देव उपस्थित होते. यावेळी शाणूदास सावंत यांनी सांगितले की, कोंकणीबरोबर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी शुक्रवार, दि. १ मे रोजी सायंकाळी ४:०० वाजता फोंडा येथील क्रांती मैदानावर जाहीर सभा आयोजित केली आहे. क्रांती मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आले.
ढवळीकर म्हणाले की, आम्ही सरकारविरोधात नाही; आजही आम्ही भाजप सरकारसोबत आहोत. मात्र, आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास सरकारला राजकीय फटका बसू शकतो. सरकारला जाग आणण्यासाठी दि. १ मे रोजी फोंड्यात भव्य सभेचे आयोजन केले आहे. सरकार आमच्या मागणीबाबत गंभीर आहे आणि अन्याय होणार नाही, अशी अपेक्षा आहे. कोंकणीबरोबर मराठीला राजभाषेचा दर्जा दिल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. सरकारने मराठीच्या बाजूने निर्णय घेतल्यास गोव्यातील जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील.
पाच लाख सह्यांचे राष्ट्रपतींना निवेदन देणार
मराठी भाषेला योग्य स्थान मिळावे आणि अन्याय दूर व्हावा, यासाठी राष्ट्रपतींना पाच लाख सह्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सभेपूर्वी समितीतर्फे फेरी काढण्यात येणार आहे. या फेरीत सुमारे पाच ते सहा दिंडी पथके सहभागी होणार आहेत.
फेरी दादा वैद्य चौकाला वळसा घालून देव झरेश्वर येथे नारळ व हार अर्पण करून पुन्हा आझाद मैदानावर येईल आणि त्यानंतर सभेला सुरुवात होईल. या सभेत डॉ. दत्ताराम देसाई, प्रा. सुभाष वेलिंगकर, गो. रा. ढवळीकर, युवा नेते मच्छिंद्र च्यारी, डॉ. अनिता तिळवे, रोशन सावंत व कादंबरीकार चंद्रकांत गावस मार्गदर्शन करणार आहेत.
Web Summary : Marathi Rajbhasha Nirdhar Samiti warns BJP: Grant official status to Marathi by September or face political consequences. A public meeting is organized on May 1st in Fonda to press for the demand, with a rally planned before it. They will also submit a petition with five lakh signatures to the President.
Web Summary : मराठी राजभाषा निर्धार समिति ने भाजपा को चेतावनी दी: सितंबर तक मराठी को राजभाषा का दर्जा दें अन्यथा राजनीतिक परिणाम भुगतने होंगे। मांग पर जोर देने के लिए 1 मई को फोंडा में एक सार्वजनिक बैठक आयोजित की गई है, इससे पहले एक रैली की योजना है। वे राष्ट्रपति को पांच लाख हस्ताक्षरों का ज्ञापन भी सौंपेंगे।