बारावीत 'लाडक्या लेकी' ठरल्या अव्वल; परीक्षेचा निकाल ९२.९६ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 13:31 IST2026-03-22T13:31:59+5:302026-03-22T13:31:59+5:30
मुली ९३.९३%, तर ९१.८९ % मुले उत्तीर्ण; २५ मार्चपासून निकालपत्र डाउनलोड करता येणार

बारावीत 'लाडक्या लेकी' ठरल्या अव्वल; परीक्षेचा निकाल ९२.९६ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बारावी परीक्षेच्या निकालात यंदाही 'लाडक्या लेकीं'नी यशाची परंपरा कायम ठेवत अव्वल स्थान पटकावले आहे. ९२.९६ टक्के निकालासह उज्ज्वल यशाची नोंद करताना मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ९३.९३ टक्क्यांवर पोहोचले असून त्यांनी मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. १७,२९३ विद्यार्थ्यांपैकी १६,०३० जण उत्तीर्ण झाल्याने राज्याच्या शैक्षणिक प्रगतीचे सकारात्मक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. तर या परीक्षेत मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.८९ टक्के आहे.
काल, शनिवारी गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेला एकूण १७,२९३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १६,०३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून, २०२५ मधील ९०.६५ टक्क्यांच्या तुलनेत यंदा २.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे राज्याच्या शैक्षणिक प्रगतीचे सकारात्मक चित्र समोर आले आहे. ही परीक्षा राज्यातील २० केंद्रांवर १० ते २७फेब्रुवारी दरम्यान पार पडली होती. कला, वाणिज्य, विज्ञान तसेच व्यावसायिक शाखांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता.
सर्व शाखांमध्ये समाधानकारक निकाल लागल्याचे चित्र आहे. निकाल जाहीर करण्यासाठी पणजी येथील मंडळाच्या परिषद कक्षात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी निकालासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. दरम्यान, शाळांना त्यांचे एकत्रित निकालपत्र २५ मार्चपासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे.
गुण पडताळणी व फेरमूल्यांकन
विद्यार्थ्यांसाठी गुण पडताळणीची प्रक्रिया २७मार्च २०२६ पासून ऑनलाइन सुरू होणार आहे-उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळवण्यासाठी प्रति विषय ३५० रुपये शुल्क आकारले जाईल, तर यासाठी १ एप्रिलपर्यंत मुदत आहे. फेरमूल्यांकनासाठी प्रति विषय ७०० रुपये शुल्क असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ एप्रिल आहे-सर्व अर्ज शाळेमार्फतच करणे आवश्यक आहे.
'विज्ञान'च्या विद्यार्थ्यांचा डंका
राज्याच्या बारावी परीक्षेच्या निकालात यंदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत आघाडी घेतली आहे. परीक्षेला बसलेल्या ९,०८० मुर्लीपैकी तब्बल ८,५२९ मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांचे उत्तीर्ण प्रमाण ९३.९३ टक्के आहे. याउलट मुलांचा निकाल २१.८९ टक्के लागला आहे. शाखानिहाय विचार केला असता विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९३.९० टक्के लागला असून त्यानंतर वाणिज्य (९२.९०%), व्यावसायिक (९२.२७%) आणि कला शाखा (९२.२१%) असा क्रम लागतो.
८७ विद्यार्थ्यांना क्रीडागुणांचा लाभ
यंदाच्या परीक्षेत २,६२६ विद्यार्थ्यांनी क्रीडा गुणांचा लाभघेतला. त्यापैकी ८७ विद्यार्थी केवळ क्रीडागुणांमुळे उत्तीर्ण झाले. त्यामुळे निकालात ०.५४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
पुरवणी परीक्षा २७ एप्रिलपासून
नापास किंवा गुण सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २७एप्रिल २०२६ पासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच २०२७ सालची बारावीची मुख्य परीक्षा ११۹ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी शाळांना २५ मार्च रोजी दुपारी ४:३० नंतर लिंक उपलब्ध होणार आहे.
८५० दिव्यांग विद्यार्थ्यांचे यश
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती देण्यात आल्या होत्या. ८८८ विद्यार्थ्यांपैकी ८५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून - त्यांचा निकाल ९५.७२ टक्के आहे. या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत, वाढीव वेळ, तळमजल्यावर बसण्याची व्यवस्था तसेच लेखक/वाचक सुविधा देण्यात आली होती.
संस्कृत विषयाचा निकाल शंभर टक्के
कालयंदाच्या बारावी परीक्षेत संस्कृत विषयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या विषयासाठी जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ते सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
धारबांदोडा केंद्राचा सर्वात कमी निकाल
बारावीच्या निकालात धारबांदोडा केंद्रात सर्वात कमी निकालाची नोंद झाली आहे. येथे १८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ७९.५७टक्के इतकी आहे.
परीक्षा केंद्रात 'चॅट जीपीटी'चा वापर करणाऱ्या त्या दोन विद्यार्थ्यांवर कारवाई
बारावी परीक्षेदरम्यान नियमांचे उल्लंघन करत मोबाईलच्या सहाय्याने कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू असताना चोरीछुपे मोबाईल केंद्रात नेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चॅट-जीपीटी या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनाचा वापर केला.
परीक्षा सुरू असतानाच मोबाईलद्वारे उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा प्रकार पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच तातडीने कारवाई करण्यात आली. संबंधित विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांसाठी शून्य गुण देण्यात आले, अशी माहिती शेट्ये यांनी दिली. या प्रकरणातील विद्यार्थ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून, दोघेही मुले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी एक विद्यार्थी उत्तर, तर दुसरा दक्षिण गोव्यातील आहे.
पेडणे तालुका ठरला राज्यात प्रथम
तालुकानिहाय निकालात पेडणे तालुक्याने ९५.९७ टक्के निकालासह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सासष्टी (९५.१७%), तिसवाडी (९५.११%) आणि बार्देश (९५.०२%) या तालुक्यांनीही उत्कृष्ट यश मिळवले आहे. दुसरीकडे धारबांदोडा (७९.५७%) आणि सत्तरी (७९.८०%) या तालुक्यांचा निकाल तुलनेने कमी राहिला. राज्यातील एकूण ११४ उच्च माध्यमिक विद्यालयांमार्फत परीक्षा पार पडली.