गौरव, सौरभ लुथरा हाजीर हो...!; आज गोव्यात आणणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:56 IST2025-12-17T11:54:55+5:302025-12-17T11:56:03+5:30
लुथरा बंधूंना ताब्यात घेतल्यानंतर गोव्यात आणण्यासाठी ट्रांन्झिस्ट रिमांड मिळविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना गोव्यात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गौरव, सौरभ लुथरा हाजीर हो...!; आज गोव्यात आणणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : थायलंडमधून दिल्लीला आणलेले गौरव लुथरा व सौरभ लुथरा यांना बुधवारी सकाळी गोव्यात आणले जाणार आहे. हडफडे येथील नाईट क्लबमधील आगीच्या दुर्घटनेतील ते प्रमुख संशयित आहेत.
लुथरा बंधूंना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना गोव्यात आणण्यासाठी ट्रांन्झिस्ट रिमांड मिळविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना गोव्यात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द्वारका येथील इंदिरा गांधी सुपरस्पेशलिटी इस्पितळात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आल्याची माहिती गोवापोलिसांकडून देण्यात आली. पोलिस दोन्ही संशयितांना आज, बुधवारी सकाळपर्यंत गोव्यात घेऊन येणार आहेत. त्यांना हणजूण पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
हडफडे येथील बर्च बाय रोमियो क्लबमधील आगीच्या दुर्घटनेतील संशयित क्लबमालक सौरभ व गौरव लुथरा यांना मंगळवारी सकाळी प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण करून थायलंडमधून दिल्लीत आणले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आधीच तैनात असलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांना ताब्यात घेतले. दि. ६ रोजी मध्यरात्री क्लबमध्ये २५ लोक आगीत मृत्युमुखी पडला. तर लुथरा बंधू रविवारी पहाटे इंडिगोच्या विमानाने भारताबाहेर पळाले होते. गोवा पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून त्यांना थायलंडमधून भारतात आणण्यात आले आहे. या कारवाईनंतर त्यांना दिल्ली विमानतळावर थेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
लुथरा बंधूंविरोधात हणजूण पोलिस स्थानकात याविषयीचा गुन्हा नोंद आहे. त्यामुळे त्यांना तेथे आणले जाईल. तेथे चौकशीनंतर त्यांना संबंधित न्यायालयात हजर करण्यात येईल. दोघांच्या चौकशीनंतर या प्रकरणातील अनेक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. लुथरा बंधूंविरोधातील गुन्हे हे कायद्याच्या उल्लंघनाचे आणि क्लबमध्ये सुरक्षाविषयक खबरदारी न घेण्याचे आहेत.
परवानग्यांवर प्रश्नचिन्ह
बर्च क्लबमधील आगीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल या याचिकांमध्ये अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीत झालेल्या कथित त्रुटी, संबंधित आस्थापनाला देण्यात आलेल्या परवानग्या आणि आपत्कालीन यंत्रणांची तयारी याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. घटनेनंतर राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी घेतलेल्या कारवाईचाही न्यायालय आढावा घेण्याची शक्यता आहे.
सरकारी वकील जेनिफर सांतामारिया यांनी तपास अधिकारी तपास कामात व्यस्त असल्याने पोलिसांचे म्हणणे सादर करण्यास जामिनावरील युक्तिवादासाठी वेळ मागून घेतला. संशयितांचे वकील अॅड. विनायक पोरोब यांनी सरकार पक्षाला वेळ देण्यास आक्षेप घेतला. त्यांनी आपला युक्तिवाद करून तिन्ही अशिलांच्या अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. या युक्तिवादानंतर न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब करत अंतरिम जामिनावरील आदेशाची सुनावणी मंगळवारी निश्चित केली होती. कालच्या सुनावणीनंतर त्यांचा अंतरिम जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला.
'त्या' क्लब व्यवस्थापकांचा अंतरिम जामीन अर्ज नामंजूर
हडफडेतील बर्च बाय रोमियो लेन या नाइट क्लबमधील आगीच्या दुर्घटना प्रकरणात हणजूण पोलिसांनी अटक केलेल्या तीन संशयितांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. त्यांच्या जामीन अर्जावर उद्या, गुरुवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयात सोमवारी क्लबचे तीन व्यवस्थापक संशयित विवेक सिंग, प्रियांशू ठाकूर व राजवीर सिंघानिया यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला.
१७ रेस्टॉरंटना नोटिसा...
कळंगुट किनारी भागात अनधिकृतपणे क्लब चालवत असल्याच्या संशयावरून ग्रामपंचायतीने १७ रेस्टॉरंटना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. या क्लबकडून परवाना, सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
लुथरांना अवघ्या २ दिवसांत ट्रेड लायसन्स कसे मिळाले?
लुथरा बंधूंना २०२३ मध्ये अवघ्या दोन दिवसांत व्यापार परवाना (ट्रेड लायसन्स) मिळाल्याचे दस्तऐवज समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कमी कालावधीत परवाना कसा मंजूर झाला, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून ग्रामपंचायत सदस्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापार परवाना देताना आवश्यक अग्निशमन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, इतर संबंधित विभागांचे अनिवार्य ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेतली नसल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष तपासणी न करता कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून परवाना मंजूर केल्याची शक्यता आहे. त्यामुळे पंच, अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यता आहे. कोणाचा दबाव, संगनमत होते का याचाही तपास होईल.
आणखी एक याचिका : १२ जानेवारीला सुनावणी
क्लबमधील आगीच्या घटनेशी संबंधित दाखल करण्यात आलेली आणखी एक जनहित याचिका (पीआयएल) गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्वतःहून (सुओ मोटो) घेतलेल्या जनहित याचिकेसोबत जोडली आहे. दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी १२ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.
सोमवारी उच्च न्यायालयाने बर्च आगीच्या गंभीर घटनेची दखल घेत स्वतःहून जनहित याचिका दाखल केली होती. या घटनेमुळे सार्वजनिक सुरक्षितता, अग्निसुरक्षा नियमांचे पालन तसेच संबंधित यंत्रणांची जबाबदारी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर याच घटनेशी संबंधित स्वतंत्र जनहित याचिका न्यायालयासमोर आली. समान मुद्दे असल्याने न्यायालयाने दोन्ही याचिका एकत्रितपणे सुनावणीस घेण्याचा निर्णय घेतला.
उपाययोजनांवर चर्चा शक्य
उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणातील कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती असून, पुढील सुनावणीत चौकशीची सद्यस्थिती, जबाबदार अधिकाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रस्तावित उपाययोजना यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या आगीच्या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने गोव्यात मोठी खळबळ उडाली असून, व्यावसायिक आस्थापनांवरील देखरेख आणि अग्निसुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे. १२ जानेवारीच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.